अगोदर देशासमोर करोनारुपी संकट निर्माण झालेले आहे, त्यात आता सातत्याने सुरू असलेल्या इंधन दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. आज (रविवार) सलग पंधराव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ कायम ठेवल्याचे दिसून आले. दरम्यान, आज पेट्रोलच्या दरात ३५ पैशांची तर डिझेलच्या दरात ६० पैसे वाढ झाली आहे. यामुळे या कालावधीत पेट्रोलच्या दरात लिटरमागे ७.९७ रुपये तर डिेझेलच्या दरात ८.८८ रुपयांची वाढ झाली आहे.  विशेष म्हणजे,  ही इंधन दरवाढ आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीत पेट्रोलचे दर ७९.२७ रुपये लिटर तर डिझेलचे दर ७८.३१ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल तब्बल ८६.२ रुपये प्रति लिटर व ७६.६७ रुपये प्रति लिटर झाले आहे. पुण्यात पेट्रोल ८५.७४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ७५.२५ रुपये प्रति लिटर आहे.चैन्नईत पेट्रोल ८२.५६ रुपये व डिझेल ७५.७९ रुपये प्रति लिटर झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ८०.९३ रुपये तर डिझेल ७३.६ रुपये प्रति लिटर आहे.

करोनाची स्थिती आणि थांबलेले अर्थचक्र लक्षात घेऊन मे पासूनच शासनाकडून टाळेबंदीत काही सवलती देण्यात आल्या. त्यानंतर इंधनाचा वापर वाढू लागला. या काळात करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून इंधनावर प्रतिलिटर दोन रुपयांचा मूल्यवर्धित कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरारवर कच्च्या तेलाची किंमत कमी असली तरी देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढताना दिसत आहे.

जूनपूर्वीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली नव्हती. या काळातील लॉकडाउनच्या कालावधीत इंधनाचा वापरही मोठय़ा प्रमाणात कमी झाला होता. मात्र, आता गेल्या १५ दिवसांपासून पेट्रोल दरवाढीचं सत्र मात्र कायम आहे. १५ दिवसांमध्ये पेट्रोल -डिझेल दरात ८ रुपयांची वाढ झाली आहे.