अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांचा आशियातील मित्र असलेल्या फिलिपिन्सला संरक्षणाचे आश्वासन दिल्यानंतर अमेरिका व फिलिपिन्सच्या लष्करी जवानांनी सोमवारी संयुक्तपणे कवायती करून चीनविरोधात शक्तिप्रदर्शन केले. फिलिपिन्सचे परराष्ट्र सचिव अल्बर्ट डेल रोझारियो यांनी सांगितले की, या संयुक्त लष्करी कवायती १० दिवस चालणार आहेत.
सध्याच्या स्थितीत चीन जास्त आक्रमक होत चालल्याचे फिलिपिन्सने बराक ओबामा यांच्या कानावर घातले होते त्यावेळी आम्ही पोलादाप्रमाणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहू असे आश्वासन त्यांनी फिलिपिन्सच्या नेतृत्वाला दिले होते.  
रोझारियो यांनी चीनचा थेट उल्लेख न करता सांगितले की, दक्षिण चीनच्या सागरातील काही ठिकाणांवर चीन दावा सांगत असल्याने दोन्ही देशातील संबंधात तणाव आला आहे. गेल्या काही काऴात चीनच्या आक्रमकतेने आशिया-पॅसिफिक भागात अशांतता आहे, प्रदेश बळकावण्याच्या हेतुपुढे कायद्याचे नियम निष्प्रभ ठरत आहेत.
अमेरिका व फिलिपिन्स यांच्यातील संयुक्त लष्करी कवायती बालिकतन (खांद्याला खांदा) नावाने ओळखल्या जात असून त्यामुळे चीनशी सामना करण्याचा फिलिपिन्सचा आत्मविश्वास वाढणार आहे.