भारतीय वंशाचे अमेरिकी छायाचित्र-पत्रकार राजन देवदास (वय ९३) यांचे निधन झाले.
गेली ५० वर्षे त्यांनी भारत-अमेरिका संबंधातील विविध टप्पे छायाचित्रांतून टिपले होते. देवदास यांना ‘पद्मश्री’ किताब मिळालेला होता. त्यांचे बृहत् वॉशिंग्टन येथील हिब्रू येथे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व आठ मुले आहेत.
५० वर्षांच्या काळात देवदास यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून मनमोहन सिंग व अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यापासून जॉर्ज बुश यांच्यापर्यंतच्या काळात भारत-अमेरिका संबंधातील टप्पे छायाचित्रातून टिपले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सप्टेंबरमधील भेट मात्र ते छायाचित्रबद्ध करू शकले नाहीत. भारताचे राजदूत बी. के. नेहरू यांनी केनेडी प्रशासनास दूतावासात माध्यमविषयक कामे सुरू करण्यास प्रवृत्त केले होते, असे अमेरिकेतील माजी राजदूत निरूपमा राव यांनी सांगितले. देवदास यांचा ९३ वा वाढदिवस वॉशिंग्टनमध्ये साजरा झाला होता, त्या वेळी त्यांचे जवळचे स्नेही उपस्थित होते.
२००२ मध्ये त्यांना भारताने पद्मश्री देऊन गौरवले होते. देवदास यांचा जन्म केरळात १९२१ मध्ये झाला. त्यांचे बालपण उत्तर प्रदेशात वाराणसी येथे गेले व शिक्षण बनारस हिंदू विश्व विद्यापीठात झाले. विद्यापीठात प्रशासकीय सहायक म्हणून काम केल्यानंतर ते १९५५ मध्ये अमेरिकेला आले.