विरोधकांना आक्रमकपणे सामोरे जाण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा, यानिमित्तानेच विरोधकांचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्र्यांना केले आहे.
नॅशनल हेराल्ड आणि केजरीवाल प्रकरणाचे निमित्त करून केंद्र सरकारवर आरोपांची राळ उठवली जात आहे. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र उभे होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी गुरूवारी रात्री आपल्या निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या(एनडीए) मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत मोदींनी आपल्या मंत्र्यांना सरकारने केलेली आणि करत असलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
केंद्र सरकार जे काही करत आहे, त्यावर विश्वास ठेवा आणि नेहमी आशावादी राहा. विरोधकांच्या खोट्या आरोपांनी बिथरून जाऊ नका, असे मोदींनी मंत्र्यांना सांगितले. लोकांशी संपर्क वाढविण्याचा तसेच सरकारने सुरू केलेल्या लोकोपयोगी योजनांची माहिती सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचविण्याचा सल्ला मोदींनी यावेळी दिला. देशाच्या विकासाला गती देणारी अनेक विधेयके विरोधकांच्या आडमुठेपणामुळे रखडून पडली आहेत, हे देखील या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असेही मोदी पुढे म्हणाले.