भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी  दिल्लीतील विज्ञान भवन येथील एक कार्यक्रम अर्धवट सोडून तातडीच्या बैठकीसाठी रवाना झाले. भाषण सुरु असताना नरेंद्र मोदी यांना सुरक्षा रक्षकाने एक चिठ्ठी आणून दिली आणि यानंतर मोदींनी भाषण आवरते घेतले. मोदींनी अशा पद्धतीने कार्यक्रम अर्धवट सोडल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मोदी हे एका तातडीच्या उच्चस्तरीय बैठकीसाठी रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंगळवारी पहाटे भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राइक केले होते. दहशतवादी तळांवर ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर बुधवारी पाकिस्तानच्या हवाई दलाच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. यातील एक विमान भारताने पाडले होते.

या पार्श्वभूमीवर दिल्लीत वरिष्ठ पातळीवर बैठकांचे सत्र सुरु आहे. सकाळी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे उपस्थित होते. सकाळी बैठकींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विज्ञान भवन येथे युवा सांसद पुरस्कार प्रदान सोहळ्यात गेले. मोदी उपस्थितांना संबोधित करत असताना त्यांना सुरक्षा रक्षकाने एक चिठ्ठी आणून दिली. ही चिठ्ठी वाचताच मोदींनी भाषण आवरते घेतले आणि ते सभागृहातून निघून गेले. मोदी हे एका उच्चस्तरीय बैठकीसाठी रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानच्या कुरापतींसंदर्भात ही बैठक असल्याचे समजते.