देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व अन्य केंद्रीय मंत्री हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले. अभियानापूर्वी नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थी व देशातील मान्यवर व्यक्तींशी संवाद साधला.

‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत राबवले जाणार आहे. या अभियानाचा नरेंद्र मोदी यांनी शनिवारी शुभारंभ केला. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिग द्वारे संवाद साधला. मोदी म्हणाले, देशातील सर्वच स्तरातील लोकांनी व स्वच्छता प्रे‍मींनी सक्रिय सहभाग नोंदविल्यामुळे ‘स्वच्छ भारत मिशन’ यशस्वी होऊ शकले. या अभियानात ज्या स्वच्छाग्रहींनी सहभाग नोंदविला, त्यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा आणि प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन हे देखील यात सहभागी झाले. चार वर्षांपासून सुरु असलेल्या स्वच्छता अभियानाला देशातील सर्वच स्तरातील लोकांनी पाठिंबा दिला आहे. टाटा ट्रस्टने स्वच्छता अभियानामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यातही टाटा परिवाराचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वच्छतेसाठी जनजागृती केली असून स्वच्छतेसोबतच सामाजिक अभियानामध्ये देखील अमिताभ बच्चन यांचे मोठे योगदान आहे. स्वच्छता अभियानात केलेल्या सहकार्याबद्दल मोदींनी बच्चन आणि टाटा यांचे आभार मानले.

अभियानाला सुरुवात होताच देशाच्या विविध भागांमध्ये भाजपाचे नेते व सरकारी अधिकारी हातात झाडू घेऊन साफसफाईसाठी रस्त्यावर उतरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
पश्चिम रेल्वेवर वांद्रे टर्मिनस आणि महालक्ष्मी येथे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. (एक्स्प्रेस फोटो: दिलीप कागडा)

या प्रसंगी रतन टाटा म्हणाले, कोणतीही वास्तू उभारण्यासाठी पाया मजबूत असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे स्वच्छता हाच आपल्या देशाचा पाया आहे. पंतप्रधानांनी स्वच्छतेसाठी जे कार्य केले, ते महत्त्वपूर्ण आणि धाडसी असल्याचे त्यांनी नमूद केले.