चीनसोबत तणाव वाढला असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि देशाचे संरक्षण प्रमुख जनरल बिपीन रावत हजर होते. याआधी परराष्ट् सचिवांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली होती. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक पार पडण्याआधी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांना बैठकीची माहिती दिली.

भारत आणि चीनमधील सैन्यांमध्ये सिक्कीम आणि लडाखमध्ये तणाव वाढला असतानाच ही बैठक बोलावण्यात आली होती. लडाखजवळ चीनकडून हवाई तळाचं काम सुरु असून सॅटेलाइट फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये चीनने हवाईतळावर लढाऊ विमानंही तैनात केलं असल्याचं दिसत आहे. यादरम्यान चीनने आपल्या दुतावासाला नोटीस पाठवून भारतात अडकलेल्या आपल्या नागरिकांना पुन्हा मायदेशी घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आहे.

सॅटेलाइट फोटोंमध्ये तिबेटमधील नगरी गुनसा विमानतळावर मोठ्या प्रमाणात चीनकडून बांधकाम सुरु असल्याचं दिसत आहे. एका महिन्याच्या अंतराने काढण्यात आलेल्या फोटोंमध्ये चीन हेलिकॉप्टर किंवा लढाऊ विमानांसाठी धावपट्टी तयार करत असल्याचं दिसत आहे. शेवटचा फोटो २० मे रोजी घेण्यात आला आहे. तिसऱ्या फोटोत धावपट्टीवर चार लढाऊ विमानं उभी असल्याचं दिसत आहे. ही J-11 किंवा J-16 लढाऊ विमानं असल्याचं सांगितलं जात आहे.

भारताने लडाखमधील गालवान व्हॅली येथे बांधकाम सुरु केल्यानंतर तणाव वाढण्यास सुरुवात झाली. चीनने गालवान व्हॅली येथे रस्ता आणि पूलचं बांधकाम करण्यावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. स्थानिकांच्या मदतीने हे बांधकाम सुरु असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं होंत. ५ आणि ६ मे रोजी भारतीय आणि चीनी सैनिक आपापसांत भिडले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लडाखच्या गालवान व्हॅली भागात धारचूक, श्योक ते दौलत बेग ओल्डीपर्यंत रस्ता बांधण्यात आला आहे. दौलत बेग ओल्डीमध्ये भारताने अत्याधुनिक धावपट्टी सुद्धा बनवली आहे. ही जगातील सर्वात उंचावरील धावपट्टी असून इथे इंडियन एअर फोर्सचे C-130 J विमान उतरु शकते. रणनितीक दृष्टीने भारतासाठी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. धारचूक, श्योक ते दौलत बेग ओल्डी याच मार्गाने भारत काराकोरम हायवेपर्यंत पोहोचू शकतो. त्यावरच चीनचा आक्षेप आहे. . धारचूक, श्योक ते दौलत बेग ओल्डीपर्यंतचा रस्ता २०१९ सालीच बांधून पूर्ण झाला आहे.