सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून चर्चा केली होती. त्यानंतर मंगळवारी मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी लंडनमध्ये स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमादरम्यान भारतीयांसोबत झालेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर जोर दिला. दरम्यान, भारतीय उच्चायुक्तालय, तेथील कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असं आश्वासन त्यांनी यावेळी मोदी यांना दिलं.

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉन्सन यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. दरम्यान, स्वातंत्र्यदिनी घडलेल्या घटनेप्रती जॉन्सन यांनी दु:ख व्यक्त केलं. तसंच भारतीय उच्चायुक्तालय, तेथील कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या प्रत्येक उपाययोजना केल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी दहशतवादाच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. तसेच कट्टरतावाद, हिंसाचार आणि दहशतवादासारख्या मुद्द्यांवर कठोर पावलं उचलण्याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच बोरिस जॉन्सन यांच्या नियुक्तीबद्दल पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदनही केलं. तसेच आगामी काळात भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही व्यक्त केला.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जवळापास अर्धातास फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय आणि क्षेत्रीय शांततेच्या प्रश्नांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याशी चर्चेदरम्यान ओसाका येथील जी-20 शिखर संमेलनाचा देखील उल्लेख करण्यात आला होता. भारत सरकारने जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 हटवल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाली.