रशियात १० जुलैला होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट होण्याची दाट शक्यता आहे.
एससीओ परिषदेला हजर राहण्यासाठी रशियातील उफा येथे एकत्र येणार असणारे हे दोन्ही नेते एकमेकांना भेटणार आहेत. तथापि, त्यांच्या बैठकीचे तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.
मोदी व शरीफ यांची यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काठमांडू येथे झालेल्या सार्क परिषदेत भेट झाली होती, परंतु त्यांची द्विपक्षीय बैठक झाली नव्हती. रमजान महिन्याच्या सुरुवातीला मोदी यांनी शरीफ यांना दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या होत्या. याच संभाषणात मोदी यांनी रमजाननिमित्त पाकिस्तानी मच्छीमारांना सोडण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानी पंतप्रधानांना कळवला होता. मोदी यांनी बांगलादेश दौऱ्यात पाकिस्तानवर केलेली टीका आणि भारताने म्यानमारमध्ये केलेली कारवाई यामुळे दोन्ही देशांमध्ये तीव्र वक्तव्यांची देवाणघेवाण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानला चुचकारण्यासाठी हे संभाषण झाल्याचे काही जणांचे मत होते.