देशातील १५ बड्या उद्योजकांचे भले करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. नोटाबंदीच्या एका निर्णयामुळेच देशाचे अतोनात नुकसान झाले. देशातल्या भ्रष्टाचारी लोकांचा काळा पैसा पांढरा व्हावा हे या मागचे मुख्य उद्दीष्ट होते, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्योजक मित्रांनी काळ्या पैशांचे रूपांतर नोटाबंदीच्या निर्णयानंतर पांढऱ्या पैशात केले. या निर्णयामुळे देशाचे काहीही भले नाही. नोटाबंदी हे जनतेवरचे आक्रमण होते, तुमच्या पायावर कुऱ्हाड मारली गेली. पंतप्रधान मोदी खरे बोलत होते जे मागील ७० वर्षात झाले नाही ते मोदींनी हा निर्णय घेऊन करून दाखवले. नोटाबंदीमुळे छोटे आणि मध्यम व्यापारी यांचे कंबरडे मोडले, सामान्य माणसाचे कंबरडे मोडले. त्यामुळे नोटाबंदी हा देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.

पंतप्रधान धडधडीत खोटे बोलत आहेत, असेही राहुल गांधी यांनी म्हटले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे संचालक असलेल्या गुजरातमधील बँकेत ७०० कोटींचा काळा पैसा पांढरा करण्यात आला. लोकांच्या खिशातून पैसे काढून उद्योजकांचे खिसे भरण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सामान्य माणसाची फसवणूक करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नोटाबंदीचा निर्णय घेऊन काहीही साध्य झाले नाही. हा जुमला नाही तर एक मोठा भ्रष्टाचार आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. जीडीपी अवघा २ टक्के वाढलाय. अशा सगळ्या परिस्थितीत देशाला नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे की त्यांनी हा निर्णय का घेतला? याचे उत्तर देशाला द्यायला हवे अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली. या एका निर्णयामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. जनतेला, छोट्या आणि मध्यम उद्योजकांना त्रास झाला. बेरोजगारी वाढली तरीही हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावर लादला कारण त्यांना त्यांच्या उद्योजक मित्रांचे भले करायचे होते असेही या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

१५ लाख रूपये प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा होतील असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. शेतकऱ्याला योग्य हमीभाव दिला जाईल असे आश्वासन दिले होते. बेरोजगारी संपवू असेही म्हटले होते मात्र त्यांनी दिलेले एकही आश्वासन पाळले नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले. बनावट नोटा बाजारातून बाहेर जातील. दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पैशांवर वचक बसेल आणि काळा बाजार नियंत्रणात येईल ही तीन कारणे नोटाबंदीच्या निर्णयासाठी देण्यात आली होती. प्रत्यक्षात यातला एकही उद्देश सफल झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय फक्त आपल्या उद्योजक मित्रांचे भले करण्यासाठी घेतला असा आरोप राहुल गांधी यांनी केला.