भारताला चिथावणी दिल्यास सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राजस्थानातील जैसलमेर येथे लोंगेवाला छावणीतील जवानांपुढे बोलताना दिला. त्यांचा रोख चीनकडे होता.

पंतप्रधानांनी जवानांसह दिवाळी साजरी करण्याच्या २०१४ पासून सुरू केलेल्या प्रथेनुसार, यंदा त्यांनी त्यासाठी जैसलमेर येथील लोंगेवाला छावणीची निवड केली. लोंगेवाला छावणीने १९७१मधील भारत-पाकिस्तान युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

एकीकडे पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून शुक्रवारी केलेला गोळीबार आणि पूर्व लडाखमध्ये चीनशी सुरू असलेला संघर्ष या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी भारतीय जवानांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न भाषणात केला.

चीनचा नामोल्लेख टाळून मोदी म्हणाले, ‘‘जगाला विस्तारवादी शक्तींनी अडचणीत आणले आहे. विस्तारवादातून अठराव्या शतकातील विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडते. भारत हा विस्तारवादी शक्तींविरोधातला एक बुलंद आवाज बनला आहे.’’ आमच्या शूर जवानांना सीमांचे

रक्षण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आजच्या जगाला भारत कुठल्याही बाबतीत किंचितही तडजोड करीत नाही हे कळून चुकले आहे, असे नमूद करून मोदी यांनी लडाख सीमेवर सुरू असलेल्या संघर्षांत भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेकडे लक्ष वेधले.

इतरांना समजून घेणे आणि समजावणे हे भारताचे धोरण आहे. पण जर कोणी आमची परीक्षा पाहिली आणि चिथावणीखोर कृती केली तर चोख प्रत्युत्तर देऊ. देशाची क्षमता आणि राजकीय इच्छाशक्ती खूप मोठी आहे. त्यामुळे आम्हाला कुणी आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मोदी यांनी दिला.

आक्रमकांना सडेतोड प्रत्युत्तर देणारे देश सुरक्षित आणि प्रगत झाले, हे इतिहास आपल्याला सांगतो. आज १३० कोटी भारतीय जवानांच्या पाठीशी उभे आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्यापुढे नतमस्तक आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की, जवानांच्या शौर्याचा आम्हाला अभिमान आहे. हे शौर्य प्रतिकूल परिस्थितीतले आहे, वाळवंटे, जंगले, महासागर, अत्यंत कमी तापमानाचे भाग अशा सर्व ठिकाणी जवानांनी मर्दुमकी गाजवली आहे.

जवनांना कानमंत्र देताना मोदी म्हणाले, ‘‘तुम्ही नेहमी नव्याचा ध्यास आणि योगसाधना या दोन्ही गोष्टींना जीवनाचा भाग बनवा. हिंदी, इंग्रजी आणि मातृभाषा सोडून आणखी एक भाषा शिकण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे जीवन समृद्ध होईल.’’

लोंगेवाला येथील लढाईचे स्मरण करताना मोदी म्हणाले, ‘ती लढाई लष्करी नियोजन आणि शौर्य यासाठी सर्वाच्या स्मरणात आहे. त्या वेळी पाकिस्तानने बांगलादेशातील निरपराध नागरिकांत दहशत माजवली होती, स्त्रियांवर अत्याचार केले होते. पाकिस्तानने पश्चिम आघाडीवर युद्ध सुरू करून जगाचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला भारताने चोख उत्तर दिले.’

पाकिस्तानशी १९७१च्या युद्धात लोंगेवाला छावणीने मोठी जबाबदारी निभावली होती. त्या लढाईचे मेजर कुलदीप सिंग चांदपुरी हे नायक होते. त्यांच्या शौर्याला अभिवादन. ती लढाई लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्यातील समन्वयाचा एक वस्तुपाठ होता, असे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले

* आजच्या काळात तुमच्याकडे मोठी क्षमता असणे महत्त्वाचे आहे.

* प्रगत आंतरराष्ट्रीय सहकार्य, समीकरणे तसेच दक्षता हा सुरक्षेचा एक महत्त्वाचा मार्ग आहे.

* सतर्कता हा सुखाचा, तर तुल्यबळ शक्ती हा शांततेचा मार्ग आहे.

* आक्रमकांना सडेतोड प्रत्युत्तर देणारे देश सुरक्षित आणि प्रगत झाले आहेत.

* भारत विस्तारवादी शक्तींविरोधातला बुलंद आवाज आहे.

जवानांसह वेळ व्यतीत केल्याशिवाय मला दिवाळी साजरी केल्यासारखे कधीच वाटणार नाही. जेवढा जास्त वेळ मी त्यांच्यासमवेत घालवीन तेवढी देशरक्षणाची माझी इच्छाशक्तीही वाढेल.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान