News Flash

PNB Scam : घोटाळ्यात बँकेचाच हात; नीरव मोदीला दिली २५ हजार कोटींची बेकायदा हमीपत्रे

न्याय वैद्यक पडताळणीमध्ये हा खळबळजनक खुलासा झाला आहे. यातून या प्रकरणातील भ्रष्टाचाराची मूळ किती खोलवर पसरली आहेत हे समोर आले आहे.

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १४ हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला खुद्द पीएनबी बँकेनेच बेकायदा पद्धतीने मदत केल्याचे समोर आले आहे. न्याय वैद्यक पडताळणीमध्ये हा खळबळजनक खुलासा झाला आहे. यातून या प्रकरणातील भ्रष्टाचाराची मूळ किती खोलवर पसरली आहेत हे समोर आले आहे.

पीएनबीने या घोटाळ्याची तक्रार केंद्रीय तपास पथकाकडे (सीबीआय) केल्यानंतर २०१८ मध्ये बेल्जिअमच्या ऑडिटर बीडीओकडे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याची जबाबदारी बँकेकडूनच सोपवण्यात आली होती. त्यानंतर ऑडिटरने २०१८ पर्यंत देण्यात आलेल्या माहितीची पडताळणी केली. यामध्ये त्यांना आढळले की, पीएनबीकडूनच एकूण २८,००० कोटी रुपयांचे मूल्य असलेली १५६१ लेटर ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) अर्थात हमीपत्रे नीरव मोदी ग्रुपला देण्यात आली होती. यांपैकी २५ हजार कोटींची १३८१ हमीपत्रे ही बेकायदा पद्धतीने देण्यात आली होती.

चौकशीमध्ये हे देखील उघड झाले आहे की, ज्या २३ निर्यातदारांच्या नावे ही हमीपत्रे काढण्यात आली होती. त्यांपैकी २१ जणांवर नीरव मोदीचे नियंत्रण होते. त्यानंतर बँकेला पैसे देण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या १९३ हमीपत्रांचा गैरवापर केला गेला. ऑडिटरने या चौकशीशी संबंधीत ५ हंगामी आणि एक अंतिम अहवाल बँकेला सोपवला आहे.

बीडीओचा हा ३२९ पानांचा न्यायवैद्यक अहवाल एका जागल्याने इंटरनॅशनल कन्सोर्टिअम ऑफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टकडे (आयसीआयजे) सोपवला होता. आयसीआयजे आणि द इंडियन एक्स्र्पेसमधील करारानुसार, न्यायवैद्यकच्या टीमचे अनेक निष्कर्ष अहवालांच्या माध्यमातून समोर आणले जाणार आहेत. नीरव मोदीचा घोटाळा किती मोठा होता याचे आकलन करण्याबाबत बीडीओचा न्यायवैद्यक अहवाल हा केंद्रीय तपास पथके सीबीआय आणि ईडीपेक्षा देखील वेगवान तपास करणारा ठरला आहे.

बीडीओच्या टीमने नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबियांच्या सर्व संपत्तींची यादी बनवली आहे. या यादीत उल्लेख केल्याप्रमाणे नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबियांच्या भारतात २० मालमत्ता आहेत. या मालमत्तांचा कोणत्याच आर्थिक देवाण-घेवाणीत तारण म्हणून वापर करण्यात आलेला नाही. तर नीरव मोदीच्या भारतात १३०० कोटी रुपयांच्या अशा १५ मालमत्ता आहेत. ज्यांचा वापर तारण म्हणून करण्यात आला आहे. त्याचबरोबर नीरव मोदीच्या परदेशातील १३ स्थावर मालमत्ताबाबतही माहिती मिळाली आहे.

न्यायवैद्यक अहवालात नीरव मोदीच्या स्थावर मालमत्तांमध्ये ५ लग्झरी कार आणि एका बेटीचा समावेश आहे. त्याशिवाय १०६ महागड्या पेंटिग्ज आहेत. ज्याची किंमत २० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या पेंटिग्जमध्ये एम. एफ. हुसैन, जमिनी रॉय, जोगेन चौधरी आणि राजा रवि वर्मा यांच्या कलाकृतींचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 1:29 pm

Web Title: pnb banks hand in nirav modi scam gave him illegal letter of undertaking of rs 25000 crore fraudulently aau 85
Next Stories
1 सनातन संस्थेवर बंदी घाला; काँग्रेस खासदार हुसेन दलवाईंची मागणी
2 काश्मीर : एलओसीनजीक हिमस्खलन, चार जवान शहीद
3 SPG सुरक्षेमध्ये पंतप्रधान असल्यासारखे वाटते, माजी पंतप्रधानाच्या मुलाची भावना
Just Now!
X