पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेल्या नीरव मोदीने आता त्यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही एक ईमेल पाठवला आहे. ‘मालत्तेवरील जप्तीच्या कारवाईमुळे आता तुमचा पगार देणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही नवीन नोकरी शोधावी’, असे नीरव मोदीने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे.

पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटी रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात नीरव मोदी हा मुख्य सूत्रधार आहे. आर्थिक घोटाळा करून पसार झालेला अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदीने मंगळवारी त्याच्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला. ‘शोरुम्समधील हिरे, दागिने व सोने जप्त करण्यात आले असून मालमत्तेवरही कारवाई सुरु आहे. तर बँक खातीही गोठवली जात आहे. यामुळे आता तुमची थकबाकी आणि पगार देणे अशक्य आहे. तुम्ही आता नवीन संधी शोधायला पाहिजे, असे त्याने ईमेलमध्ये म्हटले आहे. ‘ज्या वेगाने या घडामोडी घडत आहे त्यामुळे निष्पक्ष तपास होईल का याबाबत शंका येते’, असेही त्याने म्हटले आहे. नीरव मोदीच्या कंपनीत जवळपास पाच हजार कर्मचारी असून त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

परदेशात पलायन केल्यानंतर नीरव मोदीने पाठवलेला हा दुसरा ईमेल आहे. यापूर्वी त्याने बँकेला पत्र पाठवले होते. मी बँकेला फक्त ५ हजार कोटी रुपयांचे देणे लागतो. बँकेने कर्जाची रक्कम वाढवून सांगितली असून बँकेने प्रसिद्धीमाध्यमांकडे वाच्यता केल्यामुळेच कर्जफेडीचे मार्ग बंद झाला आहे, असे त्याने बँकेला कळवले होते.