पाकिस्तानमध्ये पोलिओचे रूग्ण जास्त असून शेजारच्या भारताला त्यामुळे धोका होऊ शकतो, असा इशारा जगातील पोलिओ लस निर्मात्या ‘सॅनोफी पाश्चर’ या कंपनीने दिला आहे.
सॅनोफी पाश्चर कंपनीचे मुख्यालय फ्रान्समधील लयोन येथे असून त्या कंपनीने म्हटले आहे की, सध्या भारत पोलिओमुक्त देश जाहीर करण्यात आला आहे, पण पाकिस्तानात पोलिओ वाढत असल्याने त्याचा फटका भारताला बसू शकतो. पाकिस्तानातून पोलिओ नष्ट झाल्याशिवाय जग पोलिओमुक्त होणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. जग पोलिओमुक्त होण्यासाठी २०१८ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
सॅनोफी पाश्चर कंपनीचे वैद्यकीय तज्ज्ञ इमॅन्युअल व्हिदोर यांनी सांगितले की, पाकिस्तानातील स्थिती चिंताजनक आहे व ती आणखी बिघडत आहे. राजकीय अस्थिरतेमुळे तेथे लसीकरण करणे अवघड आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेचे २०१८ पर्यंत पोलिओमुक्त जग साध्य करण्याचे उद्दिष्ट अवघड आहे. या संघटनेकडून पाकिस्तान, सीरिया व कॅमेरून या देशांवर प्रवासी र्निबध घालण्याची शक्यता आहे,कारण त्यांच्यामुळे पोलिओचा विषाणू पसरू शकतो. भारतात तीन वर्षांत पोलिओचा रूग्ण आढळला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
 पाकिस्तान हा जगातील तीन देशांपैकी पोलिओ असलेला देश आहे, पण त्या देशाला पोलिओमुक्त करणे अवघड आहे. कारण पोलिओविरोधात लसीकरण करणाऱ्या पथकांवर अतिरेकी हल्ले करतात, त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. यावर्षी पाकिस्तानात पोलिओचे ८४ रूग्ण सापडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार पाकिस्तानातील ८० हजार मुलांना पोलिओची लस देण्यात आलेली नाही. तालिबान व काही धर्मगुरूं चा पोलिओ लसीला विरोध असून मुस्लीम लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी हा कट आहे असे त्यांचे म्हणणे आहे. सॅनोफी पाश्चर ही कंपनी पोलिओच्या लशींचा मोठय़ा प्रमाणावर पुरवठा करते.