आपल्या देशाचा आर्थिक विकास दर जास्त अस्ला तरी एकूणच सुखाच्या निर्देशांकात देशाचा फार खालचा क्रमांक आहे, अशी खंत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केली.

भारतीय व्यापार व उद्योग महासंघाच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले. जागतिक सुख निर्देशांकात भारताचा २०१८ मध्ये १३३ वा क्रमांक लागला होता. जास्त आर्थिक विकास दर, जास्त आयुर्मान असतानाही भारतात माणसे सुखी नाहीत. स्वातंत्र्यानंतर चार वर्षांनंतर आयुर्मान ३१.४ वर्षे होते ते आतापर्यंत ६८ वर्षांपर्यंत वाढले आहे. १९४७ मध्ये जे अन्नधान्य उत्पादन होते ते आता खूपच वाढले आहे. पण सुखाच्या निर्देशांकात आपण खूप खालच्या क्रमांकावर आहोत. याचा अर्थ आपल्या देशाचा विकास हा सर्वागीण पातळीवर झाला आहे असे म्हणतात येत नाही. सुखाचे कोडे हे शाश्वत विकासाशी निगडित आहे. मानवी कल्याण, सामाजिक समावेशकता व पर्यावरण शाश्वतता यांचाही त्यात मोठा भाग आहे. आर्थिक विकासावर भर देतानाच आपण सामाजिक कल्याण व मानसिक आरोग्यावर भर दिला पाहिजे. आर्थिक उलाढाली या केवळ आर्थिक फायद्याशी निगडित नसाव्यात. त्यात आपला ग्रह, लोक, औद्योगिक विकास व वाढ यांचा समतोल विचार असला पाहिजे.