पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवायचे असेल तर प्रचाराची सूत्रे प्रियांका गांधी यांच्याकडे द्या, असा सल्ला निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी दिला आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांसमोर हा प्रस्ताव ठेवला आहे. या निवडणुकीत प्रशांत किशोर काँग्रेसच्या प्रचाराचे व्यवस्थापन करणार आहेत. त्यासाठी किशोर यांनी विविध मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून प्रियांकाना प्रचारासाठी उतरविण्याची मोठ्याप्रमाणावर मागणी होताना दिसत आहे.
प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीमधून गांधी घराण्याचे मतदारसंघ वगळल्याने आश्चर्य 
आत्तापर्यंत प्रियांका केवळ अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघात प्रचार करताना दिसून आल्या होत्या. मात्र, आगामी निवडणुकीत प्रियांका यांनी संपूर्ण राज्यभरात प्रचार करावा, असा प्रस्ताव प्रशांत किशोर यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. पूर्व उत्तर प्रदेशमधील ६० मतदारसंघांची रणनीती आखण्यासाठी प्रशांत किशोर पुढील काही दिवस लखनऊमध्ये ठाण मांडणार आहेत. सध्या किशोर यांनी तयार केलेल्या सात टीम्सकडून प्रत्येक मतदारसंघातील जातीय फॅक्टरचा आढावा घेतला जात आहे.