तोगडिया यांचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वीच अधिसूचना जारी करावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी शुक्रवारी भोपाळमध्ये केली.

तोगडिया यांनी ‘हिंदुस्तान निर्माण दल’ पक्ष स्थापला असून मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘मुस्लीम महिलांसाठी तिहेरी तलाकवर सरकार तीन अधिसूचना काढू शकते, मग मंदिरासाठी एकही अधिसूचना का काढता येऊ शकत नाही? ज्या राममंदिरासाठी शेकडो कारसेवकांनी प्राण गमावले, ज्या मंदिरावरून भाजप वाढला आणि सत्तेत आला त्या मंदिरासाठी सरकार आपली ताकद पणाला का लावू शकत नाही?’’

काँग्रेसकडून स्वागत

राममंदिरप्रश्नी त्रिसदस्यीय मध्यस्थ समिती नेमण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. पक्षप्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, गेली २७ वर्षे भाजपने श्रद्धेशी संबंधित या विषयाचा राजकीय स्वार्थासाठी अश्लाघ्य वापर केला आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसारच काय तो निर्णय होईल, या मतापर्यंत ते आले आहेत.

ही मोठी जबाबदारी

सर्वोच्च न्यायालयाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी अतिशय मोठी असून मी माझ्या सर्वोत्तम क्षमता पणाला लावून ती गांभिर्याने पार पाडीन , असे मध्यस्थ समितीचे एक सदस्य श्रीराम पांचू यांनी सांगितले.

हा दीर्घ काळ रेंगाळलेला नाजूक प्रश्न सुटावा यासाठी आपण सर्वानी एकत्र आले पाहिजे, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.

भाजपच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत करतानाच, राममंदिर बांधणे हाच एकमेव तोडगा असल्याचे नमूद केले. पक्ष सरचिटणीस मुरलीधर राव म्हणाले की, हा प्रश्न दीर्घकाळ रेंगाळलेला राहणे कुणाच्याच हिताचे नाही.