स्वयंघोषित संत राधे माँच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. पंजाब व हरयाणा हायकोर्टाने राधे माँविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पंजाब पोलिसांना दिले आहेत. सुरेंद्र मित्तल यांच्या याचिकेनंतर हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.

स्वयंघोषित संत राधे माँने धमकी दिल्याचा आरोप फगवाडामधील रहिवासी सुरेंद्र मित्तल यांनी केला होता. मी राधे माँविरोधात तोंड उघडू नये यासाठी मला धमक्या येत असल्याचे मित्तल यांनी म्हटले होते. मित्तल यांनी याप्रकरणी पंजाब व हरयाणा हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने पंजाब पोलिसांना राधे माँविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता राधे माँच्या अडचणी वाढल्या आहेत. मित्तल यांनी यापूर्वी राधे माँचे संभाषण रेकॉर्ड करुन त्याची क्लिप प्रसारमाध्यमांना दिली होती. धमकी देणे, मानसिक छळ तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांनी राधे माँविरोधात तक्रार अर्जही दिला होता.

राधे माँविरोधात २०१५ मध्ये मुंबईतील एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून राधे माँ चर्चेत आल्या होत्या. सासरी शारीरिक आणि मानसिक छळ होत असून यासाठी राधे माँ जबाबदार असल्याचा आरोप निकी गुप्ता या महिलेने केला होता. याप्रकरणी राधे माँविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एप्रिलमध्ये न्यायालयाने याप्रकरणात निकी गुप्ता यांचा पुन्हा जबाब घेण्याचे निर्देश दिले होते. पुराव्या अभावी पोलिसांनी आरोपींच्या नावांमधून राधे माँचे नाव वगळले होते. पोलिसांच्या या भूमिकेवर निकी गुप्तांनी प्रश्न उपस्थित केले होते.