कार पार्किंगच्या वादातून पंजाब पोलिसांच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्याने एका कबड्डीपटूची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कपुरथला जिल्ह्यातील गावात गुरुवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अरविंदरजीत सिंह पड्डा असं या कबड्डीपटूचं नाव आहे. आरोपी पोलीस अधिकारी परमजीत सिंह याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आलेली असून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलेलं आहे.

गुरुवारी रात्री पोलिस अधिकारी परमजीत आणि कबड्डीपटू अरविंदर यांच्यात गाडीच्या पार्किंगवरुन वाद झाला. या वादातून संतापलेल्या परमजीतने आपल्या सर्विस रिव्हॉलवरमधून अरविंदवर हल्ला केला. ज्यात अरविंदरचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असणारा एक मित्र गंभीर जखमी झालेला आहे. पोलिसांनी परमजीत सिंह याला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकारात कबड्डीपटू अरविंदरचा मित्र प्रदीप सिंहने पोलिसांना आपलं स्टेटमेंट दिलं आहे. सकाळी साडेनऊ वाजल्यापासून आपल्या भागात एक कार पार्क केलेली होती. अरविंदर आणि त्याच्या मित्रांनी ही कार नेमकी कोणाची आहे हे पाहण्यासाठी पुढे आले असता, SUV मध्ये बसलेल्या पोलिस अधिकारी परमजीत सिंहने बाहेर पडत अरविंदर व त्याच्या मित्राशी वाद घालायला सुरुवात केली. या वादातून परमजीत सिंहने केलेल्या गोळीबारात अरविंदरचा मृत्यू झाल्याचं त्याचा मित्र प्रदीप सिंहने सांगितलं.