प्रजासत्ताक दिनी सरकारकडून देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये घटनेच्या सरनाम्यातील धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द वगळण्याचा वाद आता आणखीनच भडकण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे शब्द सरनाम्यातून वगळण्याची चूक अजातणेपणाने झाली असेल, तरी ती योग्यच असल्याचे म्हटले. यापुढे हे दोन्ही शब्द सरनाम्यातून कायमचे वगळण्यात यावेत, अशी मागणीही राऊत यांनी केली. धर्माच्या मुद्द्यावरच भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली आहे. त्यामुळे फाळणीनंतर भारताला कोणत्याहीप्रकारे निधर्मी राष्ट्र म्हणणे योग्य ठरणार नाही. आजपर्यंत कोणत्याही सरकारने निधर्मीपणाचा कधीही उघडपणे पुरस्कार केला नाही. मात्र, गेल्या काही काळात हिंदूंना लाथांचा मार आणि मुस्लिमांचे लांगुलचालन म्हणजेच धर्मनिरपेक्षता असे समीकरण तयार झाले आहे. मात्र, भारत हे कायम हिंदू राष्ट्र होते आणि राहील. या चुकीमुळे अजाणतेपणाने का होईना जनतेची भावना प्रत्यक्षात आली आहे. त्यामुळे यापुढे धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द घटनेतून वगळण्यात यावेत, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली.