लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशाबद्दल विचारमंथन करण्यासाठी बोलावलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या पुत्र प्रेमावर भयंकर संतापले असल्याचे वृत्त आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार राहुल यांनी नेत्यांना त्यांच्या पुत्र प्रेमाबद्दल खडेबोलही सुनावले.

राहुल यांनी म्हटले की, आपल्या मुलाला उमेदवारी मिळवून देण्यासाठी काही नेत्यांनी दबाव आणत, राजीनामा देण्याची देखील भाषा केली. हे बोलतांना त्यांचा रोख राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ व चिदंमबरम यांच्याकडे होता. तर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान सुरूवातीला ज्योतिरादित्य सिंधीया यांनी आपण स्थानिक नेतृत्वास बळकट करायला हवे, असे म्हटले होते. यावर नाराजीच्या सुरात सर्वात शेवटी बोलताना राहुल म्हणाले की, आपल्याला यासाठी राज्यांमध्ये नेतृत्व बळकट करायला हवे का? की जेणेकरून मुख्यमंत्री आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी दबाव आणतील.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत यांनी जोधपूरमधुन लोकसभा लढवली मात्र त्यांचा पराभव झाला. तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मुलाने छिंदवाडा व चिदंबरम यांचे चिरंजीव कार्तिक चिदंबरम यांनी तामिळनाडूतील शिवगंगा येथून निवडणूक लढवली, हे दोघेही या विजयी झाले. गहलोत व चिदंबरम हे दोघेही काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आहेत, मात्र ते बैठकीस हजर नव्हते. तसेच प्राप्त माहितीनुसार, निवडणूक प्रचारादरम्यान नेत्यांनी ‘राफेल’ मुद्यावरून आक्रमकता न दाखवल्याबद्दल देखील राहुल यांनी खडेबोल सुनावले. यानंतर बैठकीच्या शेवटी राहुल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितल्यावर उपस्थित सर्व सदस्यांनी त्यांचा हा प्रस्ताव नाकारला. मात्र, तरी देखील राहुल आपल्या राजीनाम्यावर ठामच होते. दुसरीकडे राहुल यांनीच पक्षाची पुर्नबांधणी करावी, असा काँग्रेस कार्यकारिणीने प्रस्ताव पारीत केला.