उत्तप्रदेशमधील अलहाबादच्या जनतेच्या मनात स्थान मिळविण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींनी देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन त्यांचा विश्वासघात केल्याचे वक्तव्य राहुल यांनी अलाहाबादमधील  किसान यात्रदरम्यान केले. किसान यात्रच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी सध्या अलाहाबादमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी मोदींना लक्ष्य केले. यापूर्वी किसान यात्रेच्या सुरुवातीला देशातील जनता त्रस्त असताना पंतप्रधान मोदी मात्र मस्त आहेत, असे भाष्य करत राहुल गांधीनी मोदींवर निशाणा साधला होता.  राज्यातील विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यात किसान यात्रेच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरु केली आहे. काँग्रेसचे निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार, राहुल गांधी यांनी राज्यात किसान यात्रा सुरू केली आहे.

राहुल गांधी काहीही बोलत आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरेल असे भाष्य करत समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांनी राहुल गांधींना टोमणा लगावला. यावेळी त्यांनी किसान यात्रेच्या सुरुवातीला खाट चोरी प्रकरणाचा दाखला दिला. ज्यांच्या सभेतून खाट चोरीला जाते, अशा विषयी काय प्रतिक्रिया देणार असे त्यांनी म्हटले.  राहुल यांची उत्तरप्रदेशमधील किसान यात्रा खाट चोरीच्या प्रकारामुळे अधिक चर्चेत आली होती. राहुल यांच्या देवरियाच्या सभेनंतर लोक खाट घेऊन जाण्यासाठी तुटून पडल्याचे समोर आले होते. काहींनी संपूर्ण खाट आहे तशी नेली तर काहींनी त्याचे तुकडे करून नेली. सभेमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी खाट चोरी केल्याच्या चर्चेला उधाण आले होते.