भारतात सध्या मोदी सरकारकडून फुटीचे राजकारण केले जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते गुरूवारी न्यूयॉर्क येथील टाईम्स स्क्वेअरमध्ये बोलत होते. यावेळी राहुल यांनी असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. भारतामधील सहिष्णुता दिवसेंदिवस कमी का होत चालली आहे? एकेकाळी भारत ज्या एकोप्याच्या मूल्यासाठी ओळखला जात होता, तो कुठे हरवला, असा प्रश्न सध्या जगभरातून विचारला जात आहे. भारताला शांती आणि एकोप्याचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. मात्र, सध्या देशात फुटीचे राजकारण सुरू आहे. या शक्ती समाजात फूट पाडत आहेत. त्यामुळे जगभरात भारताची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप राहुल यांनी केला.

राहुल गांधींनी तीन पिढ्यांचा हिशोब द्यावा, आम्ही ३ वर्षांचा देऊ: अमित शहा

काँग्रेसच्या काळात विविध धर्मांचे लोक भारतात गुण्यागोविंदाने नांदत होते. काही लोक भारताकडे केवळ एक भूभाग म्हणून बघतात. मात्र, मी भारताकडे अनेक विचारांचा समूह म्हणून पाहतो. काँग्रेस पक्षाच्या धोरणामुळे आजपर्यंत या ठिकाणी अनेक धर्म, भाषा बोलणारे लोक आनंदाने नांदत होते. सध्या जगातील अनेक देशांमध्ये हिंसाचार सुरू आहे. मात्र, हे देश विविध समूहांना एकत्र घेऊन नांदणाऱ्या भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे आणि ती आपल्याला गमावून चालणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

भारत आणि चीन यांच्यातील स्पर्धा अटळ; रोजगारांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज