काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मत

अलीकडच्या काळात देशात प्रथमच लोकशाही संस्थांवर पद्धतशीर हल्ले झाले असून, पुढील सार्वत्रिक निवडणुका भाजप व विरोधी आघाडी यांच्यात होतील, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की भाजपला हरवण्यास काँग्रेसचे पहिले प्राधान्य राहील. भारतातील लोकशाही संस्थांवर जे हल्ले होत आहेत ते रोखण्यासाठीही काँग्रेस प्रयत्नशील आहे. पुढील निवडणूक सरळ असेल. त्यात एका बाजूला भाजप व दुसऱ्या बाजूला सगळे विरोधी पक्ष असतील. कारण देशात लोकशाही संस्थांवर कधी नव्हे इतके हल्ले झाले आहेत. भारतीय राज्यघटना व लोकशाही संस्थांवरचे हल्ले रोखण्याचे आमचे प्रयत्न आहेत. देशात भाजप जे विष पसरवत आहे ते थांबवायलाच हवे यावर विरोधकांमध्ये मतैक्य आहे. आम्ही लोकशाही देशात राहतो, पण लोकशाही संस्थांवर हल्ले होत आहेत. अहिंसा हे आमचे मूलतत्त्व आहे. कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचा मी निषेधच करतो. हिंसाचाराच्या काही घटनांच्या अनुभवातून लोकांविषयी सहवेदना निर्माण झाली. राज्यघटनेवर तर हल्ले होतच आहेत, पण लोकशाही संस्थांवरही ते होत आहेत यावर विरोधी पक्षांचे मतैक्य आहे. दडपलेल्या लोकांच्या बाजूने उभे राहणे ही आमची संकल्पना आहे, पण काँग्रेस ती लोकांना समजून देण्यात कमी पडत आहे. भारतीयांचा बळी देऊन विकास केला जात आहे. या विकासाचा फायदा भारतीयांना व्हायला हवा, आपला आवाज दडपला जात आहे असे कुणाला वाटायला नको. भारतात रोजगाराचा पेच गंभीर आहे. पण सरकार तो नाकारत आहे. चीनमध्ये दिवसाला ५० हजार रोजगार तयार होतात. भारतात दिवसाला ४५० रोजगार निर्माण होतात ही शोकांतिका आहे.

शीख दंगलीत काँग्रेस सामील नव्हती

सन १९८४ मधील शीख दंगली हे वेदनादायी शोकांतिका होती, त्या वेळी हिंसाचारात जे सामील होते त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे आपले मत आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या, त्यात तीन हजार शीख लोक मारले गेले होते. इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या शीख अंगरक्षकांनी केली होती. त्या वेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते.

दोन दिवसांच्या ब्रिटन भेटीवर असताना राहुल गांधी यांनी तेथील खासदार व स्थानिक नेते यांच्यापुढे सांगितले, ‘ती शोकांतिका होती यात शंका नाही पण त्यात काँग्रेस सामील होती या मताशी असहमत आहे. कुणाही विरोधातील हिंसाचार हा चुकीचा आहे. त्यावर भारतात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, तेव्हाच्या शीखविरोधी हिंसाचारात जे सामील होते, त्यांना शिक्षा झाली पाहिजे या मताला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे. ती वेदनादायी शोकांतिका होती पण त्यात काँग्रेस सामील होती, हे मात्र मला मान्य नाही.’

शीख दंगलींबाबत पुन्हा विचारले असता त्यांनी सांगितले, ‘जेव्हा मनमोहनसिंग बोलले तेव्हा ते आमच्या वतीने बोलले. मीही हिंसाचाराने पीडित व्यक्ती आहे त्यामुळे वेदना मी समजू शकतो. (राहुल गांधी यांचे वडील, माजी पंतप्रधान राजीव गांधी हे एलटीटीईने केलेल्या बॉम्बस्फोटात १९९१ मध्ये मारले गेले होते.) त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही हिंसाचारात सामील असलेल्यांना शिक्षा झालीच पाहिजे.