दिवाळीनंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते, अशी माहिती सचिन पायलट यांनी दिली आहे. राजस्थान प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट हे राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी रविवारी राहुल गांधींसंदर्भात हे महत्त्वाचे संकेत दिले आहेत. एवढेच नाही तर काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची घराणेशाही नाही, असाही दावा पायलट यांनी केला. राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे अध्यक्षपद दिले जावे यासाठीची तयारी बऱ्याच कालावधीपासून सुरु आहे. कोणत्याही नेत्याचे काम आणि त्याची कार्यकर्त्यांसोबत जोडलेली नाळ त्याचे महत्त्व ठरवत असते असेही पायलट यांनी म्हटले आहे.

‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला सचिन पायलट यांनी एक मुलाखत दिली याच मुलाखतीत त्यांनी राहुल गांधींकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते असे म्हटले आहे. राहुल गांधींनी पक्षाची जबाबदारी स्वीकारावी हे पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते आहे. त्यांनी आता नेतृत्त्व करण्यासाठी समोर यायला हवे असेही पायलट यांनी म्हटले.

सध्याच्या घडीला काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून राहुल गांधी खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. पक्षाच्या अनेक कामांना त्यांच्यामुळे गती आली आहे. मात्र आता त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली जावीत याची योग्य वेळ आली आहे. राहुल गांधी मागील महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते, पक्ष नेतृत्त्व सांभाळण्याची तयारीच त्यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान केली, असेही पायलट यांनी म्हटले.

प्रियांका गांधी राजकारणात येऊ शकतात का? या प्रश्नावर पायलट म्हटले, प्रियांका गांधी या गांधी कुटुंबातील आहेत, त्यांना राजकारणात यायचे की नाही हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असेल. जुन्या जाणत्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये आदर केला जातो असे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. लालकृष्ण अडवाणी आणि यशवंत सिन्हा यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची भाजपमधील अवस्था बघवत नाही असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.