दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी ट्विट करून मोदी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. मोदी सरकारनं लागू केलेल्या नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसी कायदा हे दोन्ही कायदे भारतीयांमध्ये फूट पाडणारी अस्त्रे असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्याचबरोबर याचा विरोध करण्यासाठी अहिंसक मार्गानं सत्याग्रह करणे हाच चांगला मार्ग आहे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या कायद्याविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. रास्ता रोको करत विद्यार्थ्यांनी भारत नगर येथे दिल्ली परिवहन मंडळाच्या तीन बस पेटवून दिल्या. या आगीनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त प्रचंड वाढविण्यात आला त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. जाळपोळीच्या घटनेशी संबंध नसल्याचं आंदोलक विद्यार्थ्यांच म्हणणं आहे. बसेस जाळणारे बाहेरचे लोक होते, असं विद्यार्थी संघटनांनी म्हटलं होत.

पोलिसांनी रात्री जामिया विद्यापीठात केलेल्या लाठीमारावरून बराच गदारोळ सुरू असून, देशभरात याचे पडसाद उमटले आहेत. याच घटनेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. “नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसी ही दोन्ही भारतीय समाजात फूट पाडणारी फॅसिस्टांची शस्त्रे आहेत. या घाणेरड्या अस्त्रांचा विरोध करण्यासाठी अहिंसक सत्याग्रह करणे हाच उत्तम मार्ग आहे. जे CAB आणि NRC विरोधात शांततेच्या मार्गानं विरोध करत आहेत. मी त्यांच्यासोबत आहे,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर ईशान्येत झालेला उद्रेक हळूहळू देशभर पसरू लागला आहे. रविवारी राजधानी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलक विद्यार्थी आणि पोलीस आमनेसामने आले. आयआयटी मुंबईसह देशातील अनेक शैक्षणिक संस्थामधून कायद्याला विरोध होऊ लागला आहे. लखनऊतील नदवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निदर्शनं सुरू केली. यावेळी पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर दगडफेक झाली.