काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विशेषत: त्यांच्या परदेश दौऱ्यांवर जोरदार टीका केली. मोदी परदेश दौरे करतात, मात्र ते शेतकऱ्यांच्या घरी जात नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण एनडीए सरकारला १० पैकी शून्य गुण देऊ, असेही राहुल गांधी म्हणाले.
अमेठी या आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर राहुल गांधी आले आहेत. अमेठीतील प्रस्तावित फूड पार्क रद्द करून मोदी सरकार सुडाचे राजकारण करीत आहेत, मात्र आपण फूड पार्क उभारणारच, असेही राहुल गांधी म्हणाले. अवकाळी पावसाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन  राहुल गांधी यांनी भेटी दिल्या.
एनडीए सरकारच्या वर्षभरातील कामगिरीबाबत विचारले असता राहुल गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारला १० पैकी शून्य गुण द्यावे लागतील, मात्र बडय़ा उद्योगसमूहांबाबत सरकारला १० पैकी १० गुण द्यावे लागतील. फूड पार्क रद्द केल्याने अमेठीतील शेतकरी आणि मजूर त्याचप्रमाणे शेजारचे १० जिल्हे बाधित होतील, असेही ते म्हणाले.

फूड पार्क परत मिळविणारच
अमेठीतील प्रस्तावित फूड पार्क उभारण्याचा निर्धार केलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पायपीट करीत प्रस्तावित फूड पार्कचे ठिकाण गाठले. सदर प्रकल्प रद्द केल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्कसाठी जमीन देण्यात आली आहे आणि कामही वेगाने सुरू होते, असेही ते म्हणाले. सूडाचे राजकारण करून भाजप आपल्याला खिजवण्याचा प्रयत्न करीत असले तरी या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. महाराष्ट्रासह पंजाब, तेलंगण आणि हरयाणातही भाजप अशाच प्रकारचे राजकारण करीत आहे, असेही ते म्हणाले.