काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टीकेचे लक्ष्य केले. बदल हा केवळ पोकळ आश्वासने देऊन साध्य करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सध्या विकासाच्या नावाखाली गरिबांचे हक्क हिसकावून घेण्याचा प्रकार सुरू असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सुरू असलेल्या आंदोलनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी आणि केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. मोदी आणि केजरीवाल यांना नुसती आश्वासने देऊन बदल घडवता येईल, असे वाटते. मात्र, केवळ पोकळ आश्वासनांच्या जोरावर बदल घडून येत नाही. हा प्रश्न केवळ दिल्ली किंवा सफाई कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून, हा देशभरातील गरिबांच्या सन्मानाचा प्रश्न असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. देशातील समस्त गरीब आणि दडपशाहीने पिचलेल्या वर्गासाठी हा लढा असून, त्यासाठी मी कधीही आणि कुठेही उभा राहण्यास तयार आहे.