१९ ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी अमृतसरमध्ये रावण दहन कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या रेल्वे अपघातामुळे सगळा देश हादरला. या अपघातात ६१ लोकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रेनचा ड्रायव्हर आणि गार्ड यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. रेल्वे रुळांवर उभे राहून रावण दहनाचा कार्यक्रम पाहणे हा लोकांचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा होता त्यामुळे हा अपघात घडल्याचा निष्कर्ष रेल्वे सुरक्षा मुख्य आयुक्त यांनी चौकशीनंतर काढला आहे.

अमृतसर अपघात प्रकरणात रेल्वेने ट्रेन ड्रायव्हर, गार्ड आणि इतर सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना क्लीन चिट दिली आहे. १९ तारखेला रावण दहन कार्यक्रम सुरु होता. या दरम्यान होणाऱ्या फटाक्यांचा आवाज इतका मोठा होता की रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या अनेक माणसांना रेल्वेचा हॉर्न ऐकूच आला नाही. त्यामुळे भरधाव वेगात आलेल्या एक्स्प्रेसने रूळांवर उभ्या असलेल्या लोकांना चिरडले.

रेल्वे सुरक्षा आयुक्त पाठक यांनी यासंबंधीचा अहवाल सादर केला. लोकांनी ट्रॅकवर उभे राहून रावण दहन कार्यक्रम पाहण्याचा निष्काळजीपणा दाखवला त्यामुळे हा अपघात घडला असे त्यांनी त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काही शिफारसीही करण्यात आल्या आहेत. १९ ऑक्टोबरला संध्याकाळी सहा वाजून ५५ मिनिटांनी रावण दहन कार्यक्रम होता. लोक तो पाहण्यासाठी रुळांवर उभे होते. अपघात होऊ शकतो, दुर्घटना घडू शकते हा विचार लोकांनी करायला हवा होता. लोकांनी रावण दहन पाहण्यासाठी रुळांवर उभे राहणे हा त्यांचा हलगर्जीपणा होता असेही अहवालात म्हटले आहे.