योगी आदित्यनाथ सरकार हे खुनी सरकार आहे या मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी टीका काँग्रेस नेते आणि अभिनेते राज बब्बर यांनी केली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यानं गोरखपूरच्या बाबा राघव दास रूग्णालयात दोन दिवसात ३० मुलांचा जीव गेला. सध्याच्या घडीला हा आकडा ७२ वर गेला आहे. या सगळ्यामुळे आपण व्यथित झालो असून योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवणार आहोत असंही राज बब्बर यांनी म्हटलं आहे.

गोरखपूरच्या बी.आर.डी रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यानं झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूंमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जर योगी सरकार हा दावा करतं आहे की या मुलांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला नाही तर मग नेमकं यामागचं कारण काय? असाही प्रश्न राज बब्बर यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

लहान मुलांचे जे मृत्यू झाले आहेत त्यामध्ये आता सरकार काय शोधणार आहे? हे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले आहेत, रूग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे झाले आहेत हे सगळं योगी आदित्यनाथांनी मान्य करावं आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असंही राज बब्बर यांनी म्हटलं आहे.

ज्या मुलांचा जीव गेला त्यांच्याबाबत मला अतीव दुःख झालं आहे मीडियानं उगाच तथ्य नसलेल्या बातम्या देऊ नयेत असं आवाहन थोड्याच वेळापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं. मात्र त्यांच्या या वक्तव्याचाही राज बब्बर यांनी समाचार घेतला आहे. योगी आदित्यनाथ ज्या रूग्णालयाचा दौरा करून जातात तिथे अशी दुर्घटना होऊच कशी काय शकते? असा प्रश्नही बब्बर यांनी विचारला आहे.

मागील एक महिन्यापासून ऑक्सिजन पुरविणाऱ्या कंपनीनं बिल थकल्याचं बी.आर.डी. रूग्णालय प्रशासनाला वारंवार सांगितलं होतं मात्र त्याकडे रूग्णालय प्रशासनानं दुर्लक्ष केलं. रूग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ७० पेक्षा जास्त मुलांना त्यांचा जीव गमवावा लागला. या सगळ्या प्रकरणी आता केंद्रानंही योगी सरकारकडे विस्तृत अहवालाची मागणी केली आहे.