२०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपचे श्रीराम मंदिर पूर्ण करण्याचे प्रयत्न निष्फळ करण्यासाठी समाजवादी पक्षाने आता कृष्णाचा मुद्दा पुढे आणला आहे. अखिलेश यादव यांनी श्रीकृष्णाचा ५० फूट उंचीचा पुतळा स्थापण्याची घोषणा केली केली आहे. तर आता मुलायम सिंह यादव यांनी श्रीरामाची पूजा फक्त उत्तर भारतात केली जाते तर श्रीकृष्णाची पूजा देशभरात केली जाते असे वक्तव्य केले आहे. श्रीराम हे आपले आदर्श आहेत हे मान्य आहे. मात्र श्रीकृष्णाने समाजातील प्रत्येक घटक हा समान मानला त्याचमुळे कृष्णाची पूजा देशभरात केली जाते तर श्रीरामाची पूजा फक्त उत्तर भारतापुरती मर्यादित आहे.

गाझियाबादच्या वैशाली सेक्टर ४ मध्ये एका कार्यक्रमात मुलायम सिंह यादव पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. उत्तर प्रदेशात भाजप विकास न साधता फक्त धर्माचे राजकारण करण्यावर भर देत आहे. राम मंदिर, दीपोत्सव, आरतीचे कार्यक्रम आयोजित करून फक्त हिंदूंना एकत्र आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. समाजवादी पक्षाचे सरकार असताना शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. मात्र योगी आदित्यनाथ सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. आम्ही सुरू केलेल्या योजनांच्या एक टक्काही काम भाजपने केले नाही असाही आरोप मुलायम सिंह यांनी केला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

यादव समाज श्रीकृष्णाचे वंशज आहे, यादव समाजही समाजातील सगळ्या घटकांना समान मानतो. रामाची पूजा फक्त उत्तर भारतात केली जाते आणि श्रीकृष्णाची पूजा देशभरात केली जाते या वाक्याचाही मुलायम सिंह यादव यांनी पुनरूच्चार केला. एवढेच नाही तर श्रीकृष्णाचे नाव जगभरात घेतले जाते. यादव समाजाच्या महोत्सवात फक्त यादवांचा नाही तर समाजातील प्रत्येक घटकांचा सन्मान केला जाणार आहे असेही यादव यांनी स्पष्ट केले. सैफईमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती तयार करण्यात येते आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी या मूर्तीचे अनावरण केले जाणार आहे. सैफई महोत्सव आयोजित करणाऱ्या समितीने यासाठी निधी दिला आहे. मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव या समितीचे सदस्य आहेत.