केंद्रातील भाजपप्रणीत एनडीए सरकारची एरवी स्तुती करणाऱया योगगुरू रामदेवबाबा यांनी यावेळी यू-टर्न घेत मोदींच्या मंत्र्यांवर जोरदार टीका केली. तर, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. मोदींचे मंत्री अहंकारी झाले असल्याचा खरमरीत टोला रामदेव यांनी लगावला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रामदेव बाबांनी मोदींचे कौतुक केले मात्र त्यांच्या सरकारमधील कांही मंत्र्यांवर ते नाराज झालेले दिसले. मोदींच्या सरकारमधील मंत्री अंहकारी झाले आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह इतर काही भाजप मंत्र्यांनी त्यांचे नंबर बदलले आहेत, जे अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी जनतेच्या संपर्कात राहून त्याचे म्हणणे ऐकले पाहिजे. काही काळाने का होईना परत निवडणुका लढवायच्या आहेत हे त्यांनी विसरता कामा नये, असे रामदेव बाबा म्हणाले.
पुढे रामदेव यांनी राहुल गांधींचे कौतुक करत काँग्रेसमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्यास राहुल यांना यश आले असल्याचे ते म्हणाले. भूसंपादन विधेयकावरून राहुल यांनी भाजप सरकारला चांगलेच कोंडीत धरले आहे. पराभवानंतर काही काळ अदृश्य झालेल्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व आता राहुल यांच्यामुळे पुन्हा दिसू लागले आहे, असेही रामदेवबाबा पुढे म्हणाले.