विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) प्रमुखांसमवेत गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत काय शिजले ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे नेते रशीद अल्वी यांनी सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांना दिले आहे.
मुलायमसिंग यादव हे भाजपचे हात अधिक बळकट करीत आहेत. उत्तर प्रदेशात अलीकडे जातीय दंगली उसळल्या त्यावरून आपण एका वर्षांपूर्वी केलेले वक्तव्य खरे असल्याचे सिद्ध झाले आहे. मुलायमसिंग आणि भाजप हे एकत्र आहेत आणि तेच अलीकडील घटनांवरून स्पष्ट होत आहे, असे अल्वी म्हणाले.
मुलायमसिंग हे भाजपचे हस्तक
भाजपचा सर्वात मोठा हस्तक हे मुलायमसिंग आहेत, असे आपण गेल्या १० वर्षांपासून सांगत आहोत, असे गेल्या जून महिन्यात महापालिका निवडणुकीच्या जाहीर सभेत अल्वी यांनी म्हटले होते. भाजपच्या तालावर जर कोणी नाचत असेल तर ते मुलायमसिंग आहेत, असेही अल्वी म्हणाले.
तथापि, काँग्रेसने अल्वी यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर ठेवले होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला विविध पक्षांकडून त्या वेळी पाठिंबा हवा होता. त्यानंतर मे २०१३ मध्ये अल्वी यांची पक्षाच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.
सिंघल-मुलायमसिंग गुफ्तगू
विश्व हिंदू परिषदेने पंचकोशी यात्रेचा निर्धार व्यक्त केला त्यापूर्वी अशोक सिंघल यांच्याशी जवळपास तासभर झालेल्या बैठकीत काय शिजले, ते यादव यांनी देशवासीयांसमोर जाहीर करावे, असे अल्वी म्हणाले. मात्र त्यानंतर सपा सरकारने सदर यात्रेवर बंदी घातली तेव्हा सिंघल यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
मुलायमसिंग आणि त्यांचे मुख्यमंत्री पुत्र अखिलेश यांच्याशी सदर यात्रेबाबत चर्चा केली होती, असे सिंघल यांनी नमूद केले होते, त्याकडे अल्वी यांनी लक्ष वेधले.