ग्रामीण भागाला होणारा नव्या नोटांचा पुरवठा वाढवण्यात यावा, असे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना दिले आहेत. ग्रामीण भागात ४० टक्के नोटा पाठवण्याचे स्पष्ट आदेश रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आले आहेत. ‘ग्रामीण आणि दुर्गम भागात नोटांची मागणी जास्त आहे. मात्र या भागात त्या तुलनेत नोटा पोहोचत नाहीत’, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. ग्रामीण भागांची गरज ओळखून त्यांना नव्या नोटा पुरवल्या जाव्यात, असे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देण्यात आले आहेत.

‘नव्या नोटांचा पुरवठा करताना बँकांनी मागणी लक्षात घ्यावी. ग्रामीण भागात नोटांचा तुटवडा जाणवतो आहे. ग्रामीण भागातील लोक त्यांच्या दैनंदिन व्यवहारांसाठी रोख रकमेवर अवलंबून असतात. त्यामुळे या भागांमध्ये नव्या नोटा पुरवण्याला बँकांकडून प्राधान्य देण्यात यावे. एका जिल्ह्यातील खात्यांची संख्या लक्षात घेऊन नव्या नोटांचा पुरवठा करण्यात यावा,’ अशा सूचना रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आल्या आहेत.

बँकांच्या करन्सी चेस्टना ग्रामीण भागात कमी मूल्यांच्या नोटा पुरवण्याच्या सूचनादेखील रिझर्व्ह बँकेने केल्या आहेत. ग्रामीण भागातील व्यवहार कमी किमतीचे असल्याने तिथे सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून या सूचना करण्यात आल्या आहेत.

‘बँकांच्या करन्सी चेस्टनी ग्रामीण भागात पाचशे आणि त्याखालील मूल्यांच्या नोटा ग्रामीण भागात उपलब्ध करुन द्याव्या. सध्या उपलब्ध असलेल्या शंभर रुपये आणि त्यापेक्षा कमी मूल्यांच्या नोटादेखील ग्रामीण भागातील बँकांच्या शाखांमध्ये उपलब्ध करुन दिल्या जाव्यात,’ असे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.