भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर भारताच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावरुन सर्वच विरोधकांनी केंद्रातील भाजपा सरकारला लक्ष्य केलं असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. उर्जित पटेल यांचा राजीनामा देशाच्या अर्थव्यवस्थेला जबर धक्का असल्याचं मनमोहन सिंग म्हणालेत.

‘डॉक्टर पटेल हे एक मोठे अर्थशास्त्री होते. भारतातील आर्थिक संस्था आणि आर्थिक नितींबाबत अत्यंत काळजी असणारे व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा देणं दुर्दैवी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का आहे’ असं मनमोहन सिंग म्हणाले. तसंच, ‘केंद्राचे लक्ष रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीकडे असल्याचा संशय आरबीआयकडून काही दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आला होता, आता तसं काही घडणार नाही अशी मी अपेक्षा ठेवतो’ असंही सिंग म्हणाले.


यापूर्वी सोमवारी(दि.10) पंजाबच्या मोहाली येथे बोलताना सिंग यांनी भाजपा सरकार देशाला चुकीच्या मार्गावर घेऊन जात आहे, असा गंभीर आरोप केला. देशाचं स्वातंत्र्य मजबूत करण्यात काँग्रेसनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण गेल्या साडेचार वर्षात या भाजप सरकारनं भारताच्या इतिहासावर प्रतिकूल परिणाम होऊ शकेल, अशा गोष्टींना बळ दिलं आहे.  सरकारचा सध्याचा कारभार पाहता देशाचं स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.  याशिवाय, हे सरकार कशा पद्धतीनं देशाला चुकीच्या मार्गानं घेऊन जात आहे, हे जनतेनं समजून घ्यायला हवं. त्याविरोधात सगळ्यांनी ताकदीनं लढायला हवं, असं आवाहनही त्यांनी केलं.