News Flash

JioPhone Next – मुकेश अंबानींनी केली सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा! गणेश चतुर्थीला होणार लाँच!

रिलायन्स इंडस्टीचे प्रमुख मुकेश अंबानी यांंनी Reliance AGM मध्ये नव्या JioPhone Next ची घोषणा केली आहे. हा फोन सर्वात स्वस्त असून १० सप्टेंबरला लाँच होईल.

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची ४४वी वार्षिक महासभा (AGM ) (photo indian express)

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४व्या वार्षिक महासभेमध्ये (Reliance AGM) रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी भारतात JioPhone Next ची घोषणा केली आहे. जियो फोन नेक्स्ट हा फक्त भारतातीलच नव्हे, तर जगात सर्वात स्वस्त फोन असेल, असा दावा वार्षिक सभेदरम्यान या फोनची घोषणा करताना मुकेश अंबानी यांनी केला आहे. “भारताला टूजी मुक्त करायचं असेल, तर सर्वांना परवडेल अशा खऱ्या अर्थाने स्वस्त स्मार्टफोनची गरज आहे. त्या आधारावर जिओ आणि गुगल यानी मिळून जिओ फोन नेक्स्ट डेव्हलप केला असून भारतात तो लाँच केला जाणार आहे”, असं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले.

 

जिओ आणि गुगलने संयुक्तपणे हा फोन तयार केला असून तो पूर्णपणे फीचर स्मार्टफोन असणार आहे. या फोनसाठी अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचं ऑप्टिमाईज्ड व्हर्जन तयार करण्यात आलं आहे. या फोनमध्ये अँड्रॉइड, गुगल आणि जिओचे सर्व मोबाईल अॅप्लिकेशन्स युजर्सला वापरता येणार आहेत. खास भारतीय बाजारपेठेसाठी गुगल आणि जिओनं संयुक्तपणे हा फोन विकसित केला असून इतर स्मार्टफोन फीचर्सप्रमाणेच या फोनमध्ये अनेक फीचर्स असणार आहेत, अशी माहिती यावेळी मुकेश अंबानी यांनी दिली. दरम्यान, या फोनची किंमत एजीएममध्ये जाहीर करण्यात आली नसून लवकरच ती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

 

१० सप्टेंबरला होणार JioPhone Next लाँच

दरम्यान, या नव्या फोनची किंमत जरी जाहीर करण्यात आली नसली, तरी हा फोन या वर्षी १० सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी लाँच केला जाईल, असं मुकेश अंबानी यांनी यावेळी जाहीर केलं. त्यामुळे लवकरच देशाला टूजी मुक्त करता येणं शक्य होणार असल्याचं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले. येत्या काही दिवसांत या फोनची किंमत देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये व्हॉइस असिस्टन्स, ऑटोमॅटिक रीड अलाऊड, स्मार्ट कॅमेरा असे फीचर्स असणार आहेत. JioPhone Next आधी भारतात लाँच केला जाईल आणि नंतर जगभरातल्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2021 3:36 pm

Web Title: reliance agm live mukesh ambani announcement jiophone next with google pmw 88
Next Stories
1 “सध्या तरी आम्ही अनुच्छेद ३७० बद्दल बोलणार नाही”; पंतप्रधानांसोबतच्या बैठकीआधी काँग्रेसचा खुलासा
2 देशात लसीकरणाचा आकडा ३० कोटींच्या पुढे; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
3 बहिणीच्या नवऱ्यासोबत गेली होती पळून; अल्पवयीन मुलीला दीड लाखांना विकले
Just Now!
X