News Flash

“उद्धव ठाकरेंनी निर्लज्ज राजकारण थांबवावं”, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मुख्यमंत्र्यांवर परखड टीका!

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दांत टीका केली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात आणि देशभरात देखील करोनाचे रुग्ण आणि करोनामुळे होणारे मृत्यू यामध्ये मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. त्यामुळे नागरिक चिंताग्रस्त झाले असून त्यात रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या तुटवड्याची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून लस तुटवड्यानंतर या गोष्टींच्या तुटवड्यावर आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. त्यात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप केल्यानंतर थेट केंद्रातून मंत्री पियुष गोयल यांनी परखड शब्दांमध्ये महाराष्ट्र सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी”, असं ट्वीट पियुष गोयल यांनी केलं आहे.

 

ऑक्सिजन पुरवठ्यावरून पियुष गोयल भडकले

नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर पुरवठ्यावरून टीका केल्यानंतर पियुष गोयल यांनी चार ट्वीट करत राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. “ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरेंनी चालवलेल्या क्लृप्त्या पाहून दु:ख झालं. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचं उत्पादन व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे. आपण सध्या आपल्या क्षमतेच्या ११० टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत असून उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन देखील वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात आहे”, असं पियुष गोयल म्हणाले आहेत.

महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा?

पुढच्याच ट्वीटमध्ये गोयल यांनी राज्याला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवला जात असल्याचा दावा केला आहे. “आत्तापर्यंत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत आहे”, असं गोयल म्हणाले आहेत.

 

“उद्धव ठाकरेंचं राजकारण पाहून दु:ख होतंय”

“कालच पंतप्रधानांनी घेतलेल्या आढाव्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी या संकटकाळात एकत्रपणे काम करण्याचं आवाहन केलं आहे. पण हे सगळं असताना उद्धव ठाकरेंकडून सुरू असलेलं राजकारण पाहून दु:ख होत आहे. त्यांनी हे निर्लज्ज राजकारण थांबवलं पाहिजे आणि जबाबदारी घेतली पाहिजे”, असं देखील गोयल यांनी म्हटलं आहे.

“आता वेळ आली आहे की…!”

महाराष्ट्रत सध्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकार आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या लोकांसाठी योग्य ते काम करत आहे. महाराष्ट्रातले नागरिक माझे कुटुंब माझी जबाबदारीचं योग्य पद्धतीने पालन करत आहेत. पण आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची कर्तव्य पाळून माझं राज्य, माझी जबाबदारी हे तत्व पाळण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत पियुष गोयल यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

केंद्रानं मदत केली नाही, तर औषध साठा जप्त करू; नवाब मलिक यांचा इशारा

नवाब मलिकांचे केंद्र सरकारवर आरोप!

“राज्यातल्या औषध कंपन्यांकडे महाराष्ट्र सरकारने रेमडेसिवीरची मागणी केल्यानंतर केंद्राने त्यांना सांगितलं की महाराष्ट्राला औषधं देऊ नका नाहीतर तुमच्यावर कारवाई करू. दर केंद्राने तात्काळ औषधं आम्हाला विकण्याची परवानही कंपनीला दिली नाही, तर राज्य सरकार साठा जप्त करेल”, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 4:33 pm

Web Title: remdesivir oxygen supply in maharashtra piyush goyal slams uddhav thackeray pmw 88
Next Stories
1 उत्तर प्रदेशात विना मास्क कायदा शिकवण्याऱ्या पोलिसाला नागरिकांचा हिसका
2 चारा घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव यांना अखेर जामीन
3 Twitter सेवा ठप्प झाल्याने ४० हजाराहून अधिक युजर्सची तक्रार
Just Now!
X