भारताचे सामर्थ दाखवणारा भव्य दिव्य असा खास सोहळा राजपथावर ६९व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडला. या सोहळ्यातील अनेक राज्यांचे तसेच अनेक सराकारी विभागांचे चित्ररथ सहभागी झाले होते. मात्र त्यात विशेष लक्ष वेधून घेतले ते महाराष्ट्राच्या चित्ररथाने.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाचा देखावा यंदाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर उभारण्यात आला होता. राज्यभिषेक सोहळ्याचा हा चित्ररथ कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या ‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है ।’ या काव्याच्या सुरांमध्ये राजपथावर दाखल झाला. राजांचा पराक्रम आणि साहसाचे वर्णन करणारा हा चित्ररथ राजपथावर येताच राज्यसभा खासदार छात्रपती संभाजीराजांनी आपल्या कुटुंबासहित जागेवर उभं राहात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या. दूरदर्शनवरून या सोहळ्याचे थेट प्रेक्षपण करण्यात आले त्यावेळी कॅमेरामध्ये हे क्षण टिपले गेले. राजपथावर आपल्या राज्याचा चित्ररथ आल्यावर जागेवरून उठून आनंद साजरा करणारे संभाजीराजे एकमेव नेते नव्हते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जागेवर उभं राहून टाळ्या वाजवत चित्ररथाचे स्वागत केले.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर एकूण २३ चित्ररथांनी सादरीकरण केले. त्यामधील १४ चित्ररथ राज्यांचे होते. तर सरकारी खात्यांच्या ७ चित्ररथांचा समावेश होता. त्याचप्रकारे यंदा दोन खास चित्ररथांचा या संचलनात समावेश कऱण्यात आला होता जे भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे होते.

कसा होता महाराष्ट्राचा चित्ररथ

महाराष्ट्राच्या चित्ररथावर राजांची अश्वारुढ प्रतिकृती होती. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती उभारून तेथेच मेघडंबरीमध्ये सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झालेले दाखवण्यात आले होते. राजांच्या आजूबाजूला आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट आणि राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजनही दाखवण्यात आला होता.

याचबरोबर शिवरायांच्या शेजारी राजमाता जिजाऊ, पत्नी सोयराबाई आणि छोटे संभाजीराजेही दाखवण्यात आले होते. हा चित्ररथ कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंच्या संकल्पनेतून साकारण्यात आला होता.