अमेरिकी काँग्रेसमधील प्रतिनिधिगृहात कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारप्रकरणी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याबाबत रिपब्लिकन पक्षामध्ये मतभेद झाले. दरम्यान, प्रतिनिधीगृहाने २५ व्या घटना दुरुस्तीनुसार उपाध्यक्षांनी हकालपट्टीची कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे.

प्रतिनिधिगृहाने महाभियोगाची कारवाई सुरू करण्यापूर्वी उपाध्यक्ष माईक पेन्स यांना पंचविसाव्या घटना दुरुस्तीनुसार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती करण्यास सांगितले आहे. याबाबतचा ठराव २२३ विरुद्ध २०५ मतांनी मंजूर झाला असून पक्षीय पातळीवर हे मतदान झाले.

प्रतिनिधिगृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व असून एका रिपब्लिकन प्रतिनिधीने ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर इतर पाच जण तटस्थ राहिले. याबाबतच्या ठरावात असे म्हटले आहे, की उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी २५ व्या घटना दुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ट्रम्प यांना अधिकारपदावरून दूर करावे.

यातील २५ वी घटना दुरुस्ती ही पन्नास वर्षांपूर्वी अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या खुनानंतर मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार अध्यक्ष जर काम करण्यास सक्षम नसतील तर त्यांच्या जागी उपाध्यक्ष देशाचा कारभार करू शकतात अशी तरतूद आहे. या तरतुदीनुसार उपाध्यक्ष पेन्स हे मावळते अध्यक्ष ट्रम्प यांना अक्षम ठरवून पदावरून काढून टाकू शकतात. त्यासाठी त्यांना मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

पेन्स यांनी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पलोसी यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले होते, की २५ वी घटना दुरुस्ती लागू करून ट्रम्प यांना आपण काढून टाकणार नाही. राज्यघटनेतील २५ वी दुरुस्ती ही अध्यक्षांना शिक्षा करण्याच्या उद्देशाने केलेली नाही, त्यामुळे ट्रम्प यांना काढून टाकण्यासाठी या तरतुदीचा वापर केल्यास चुकीचा पायंडा पडू शकतो. पलोसी यांनी सभागृहात ६ जानेवारीला असे सांगितले होते, की ट्रम्प यांनी अमेरिकेतील कॅपिटॉल हिल या संसदेच्या इमारतीत हिंसाचाराला उत्तेजन दिले होते. त्यामुळे अमेरिकी लोकशाहीला काळिमा फासला गेला आहे. जो बायडेन व कमला हॅरिस यांच्या निवडीवर प्रतिनिधीवृंदाचे शिक्कामोर्तब होत असताना ट्रम्प यांनी हा हिंसाचार घडवून आणला होता.

ट्रम्प यांचे यूटय़ूब चॅनेल स्थगित

हाँगकाँग : ‘हिंसाचार भडकवण्याची क्षमता असल्याच्या’ चिंतेमुळे यूटय़ूबने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चॅनेल किमान एक आठवडय़ासाठी स्थगित केले आहे. डोनाल्ड जे. ट्रम्प चॅनेलवर १२ जानेवारीला अपलोड करण्यात आलेला हिंसाचार भडकवू शकणारा मजकूर आपण हटवला असल्याचे गूगलच्या मालकीच्या यूटय़ूब या व्यासपीठाने सांगितले; मात्र नेमक्या कोणत्या ध्वनिचित्रफितींमुळे यूटय़ूबच्या नियमांचा भंग झाला, हे लगेच कळू शकलेले नाही. ‘काळजीपूर्वक आढावा घेतल्यानंतर, तसेच हिंसाचार भडकू शकण्याबाबत व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर या चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला मजकूर आम्ही हटवला असून, हिंसाचाराबाबतच्या आमच्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल इशारा जारी केला आहे’, असे यूटय़ूबच्या प्रवक्त्याने ई-मेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. या स्थगितीअन्वये, ट्रम्प यांच्या चॅनलला नवे व्हिडीओ किंवा लाइव्ह स्ट्रीम्स किमान ७ दिवस अपलोड करण्यास तात्पुरती मनाई करण्यात आली असल्याचे यूटय़ूबने सांगितले आहे.