करोनाविरोधातील लढय़ात लस उपलब्ध होणे हाच प्रभावी उपाय असल्याने जगभर संशोधन केले जात आहे. त्यापैकी आठ लसींवरील संशोधन प्रगतीपथावर आहे. त्यातही चार लसींवरील प्रयोग लक्षवेधी असून ते संशोधनाच्या पुढील टप्प्यावर पोहोचलेले आहेत, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य आणि करोनासंदर्भातील संशोधन-विकास कृतीगटाचे सहअध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

एका बाजूला लस संशोधनाचे काम सुरू असले तरी करोनावर कोणती औषधे प्रभावी ठरू शकतील यावरही अधिक प्रयोग केले जात आहेत. फेव्हिपिराव्हीर, रेमडेसीव्हीर, टोसिलिझूमॅब, कन्व्हेलेसंट प्लाझ्मा, अर्बिडॉल, हायड्रोक्झिक्लोरोक्विन, देशी बनावटीचै औषध ओसीक्यूएच तसेच, बीसीजी लस अशा विविध औषधे करोनाविरोधात किती प्रभावी ठरू शकतात यावर अधिक वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. लस आणि औषध अशा दुहेरी आयुधांच्या साह्य़ाने करोनावर मात करावी लागणार आहे, असे डॉ. पॉल म्हणाले.

प्राधान्यक्रम ठरवावा लागेल!

लस उपलब्ध झाली तर ती प्राधान्याने समाजातील कोणा-कोणाला दिली पाहिजे, याचा विचार आत्तापासून केला पाहिजे. लस म्हणजे एखादे बटण नव्हे की ती दाबले की ही लस लगेचच सर्वाना मिळेल. या लसीची प्रत्येकाला गरज लागणार आहे. त्यामुळे लसीची लोकांसाठी असलेली उपलब्धता हे देशासमोरील मोठे आव्हान असेल, असा मुद्दा विजय राघवन यांनी मांडला. दुसरे महत्त्वाचे आव्हान म्हणजे करोनाविषाणूविरोधात प्रभावशाली औषध उपलब्ध करणे. एखादे औषध विषाणूविरोधात काम करत असले तरी त्याचे शरीरावर दुष्परिणामही होतात हे लक्षात घेऊन औषध शोधून काढावा लागेल. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळ (सीएसआयआर) आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण संस्था (एआयसीटीई) हॅकेथॉनची सुरुवात केली असून विद्यार्थ्यांना औषधनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जात आहे, अशीही माहिती राघवन यांनी दिली.

हायड्रोक्झिक्लोरोक्विन योग्यच!

मलेरियाविरोधात प्रभावी ठरलेल्या हायड्रोक्झिक्लोरोक्विन गोळ्यांच्या वापराबाबत जगभरात वाद सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या गोळ्यांचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, हायड्रोक्झिक्लोरोक्विनचा फारसा दुष्परिणाम होत नसल्याने या गोळ्यांचा करोनाविरोधात वापर करण्याची भूमिका भारताने घेतली आहे. त्यासंदर्भात, हायड्रोक्झिक्लोरोक्विनवर अधिक संशोधन केले जात असल्याने आणखी नव्या गोष्टीही समजू शकतील. हायड्रोक्झिक्लोरोक्विनमुळे पेशीतील अल्कलीचे प्रमाण वाढते व विषाणूंची वाढ थांबवते ही बाब जगजाहीर आहे. शिवाय, हायड्रोक्झिक्लोरोक्विनचा वापर खूप वर्षांपासून होत आहे. डॉक्टर, नर्स त्याचा वापरही करत आहेत, असा मुद्दा उपस्थित करत डॉ. पॉल यांनी हायड्रोक्झिक्लोरोक्विनच्या वापराचे समर्थन केले.

देशात ३० गट लस विकसित करण्याच्या प्रयत्नात

भारतातही लस शोधण्यासाठी प्रयत्न केले जात असून वैद्यकीय संस्था, जैव-वैद्यकीय संशोधन संस्था, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती असे तब्बल ३० संस्था-गट-व्यक्ती संशोधन करत आहेत. त्यापैकी २० गट अधिक वेगाने प्रगती करत आहेत, अशी माहिती केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन यांनी दिली. कुठलीही लस शोधून काढण्यासाठी १० ते १५ वर्षे लागतात आणि त्यासाठी २०० ते ३०० दशलक्ष डॉलर इतका प्रचंड खर्च येतो. पण, करोनाविरोधातील लस वर्षभरात शोधून काढण्याचे आव्हान जगासमोर असून एकाचवेळी १०० लसींवर संशोधन केले जात आहे. त्यासाठी किमान २ ते ३ अब्ज डॉलर इतका खर्च येण्याची शक्यता आहे, असेही राघवन म्हणाले. मात्र अजून एकाही भारतीय कंपनीची संभाव्य लस वैद्यकीय प्रयोग (क्लिनिकल ट्रायल) करण्याच्या टप्प्यावर पोहोचलेली नाही, असेही राघवन म्हणाले.