दोन दिवसांमध्ये सुविधा सुरू, रेल्वेगाडय़ांच्या संख्येतही वाढ

नवी दिल्ली : करोनामुळे स्थगित झालेली प्रवासी रेल्वेसेवा पूर्ववत करण्याची वेळ आली असून पुढील काही दिवसांमध्ये रेल्वेची संख्या वाढवली जाईल. तसेच, दोन-तीन दिवसांमध्ये रेल्वे स्टेशनांमधील तिकीट खिडक्यांवरही रेल्वेचे आरक्षण करता येऊ शकेल. शिवाय, देशभरातील १.७ लाख सार्वजनिक सेवा केंद्रांवरही रेल्वेचे तिकीट मिळू शकेल, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली.

करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यामुळे देशभरातील प्रवासी रेल्वेसेवा २४ मार्चपासून बंद करण्यात आली होती. आता टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यामध्ये ती टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. १ जूनपासून १०० रेल्वे सोडण्यात येणार आहेत. या रेल्वे गंतव्य स्थानकांवरून मूळ स्थानकांवर परत येतील. त्यामुळे एक रेल्वे दोन फेऱ्या करेल. अशा २०० रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. या गाडय़ांसाठी ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर ऑनलाइन आरक्षणाची प्रक्रिया गुरुवारी सुरू झाली.

मात्र, प्रत्येक प्रवाशाकडे ऑनलाइन तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्याला रेल्वे स्थानकावर जाऊन तिकीट आरक्षित करावे लागते. अशा लाखो प्रवाशांनाही तिकीट मिळण्याची सुविधा आता मिळू शकेल. ही व्यवस्था कशी राबवली जाईल, याबाबत येत्या काही दिवसांमध्ये माहिती दिली जाईल, असेही गोयल यांनी सांगितले. रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थाची छोटी दुकाने व खानावळ खुली केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना जेवणाखाण्याची सोय उपलब्ध होऊ शकेल.

१५ रेल्वे स्थानकांसाठी १२ मेपासून विशेष प्रवासी गाडय़ा सोडल्या जात आहेत. स्थलांतरित मजुरांना मूळ गावी सोडण्यासाठी रेल्वेने आतापर्यंत २,०५० श्रमिक विशेष रेल्वे सोडल्या. त्यातून ३० लाखांहून अधिक स्थलांतरित मजूर मूळ राज्यात पोहोचले असल्याची माहितीही गोयल यांनी दिली.

प्रवास करताना..

१ जूनपासून सुटणाऱ्या रेल्वेगाडय़ांसाठी पहिली आरक्षण यादी रेल्वे सुटण्याच्या चार तास आधी तयार केली जाईल व दुसरी यादी २ तास आधी केली जाईल. ही यादी ३० मिनिटे आधी तयार केली जात असे. या गाडय़ांसाठी आत्ता तरी तिकीट खिडकीवर आरक्षणाची सोय उपलब्ध नाही. आरएसी व प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. आरक्षण नसेल तर रेल्वेगाडीत प्रवेश मिळणार नाही. प्रवासादरम्यान तिकीटवाटप केले जाणार नाही. तात्काळ व प्रिमियम तात्काळची मुभा नाही. करोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच रेल्वेत बसण्याची अनुमती दिली जाईल. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जाईल. प्रवाशांनी रेल्वेगाडी सुटण्याआधी तीन तास स्थानकांवर आले पाहिजे. आरक्षण निश्चित झाले असेल तरच स्थानकामध्ये प्रवेश दिला जाईल. आरक्षित तिकीट रद्द करता येऊ शकेल व पैसेही परत मिळतील. प्रवाशांनी स्वत: जेवणाखाण्याची तसेच पिण्याच्या पाणीची सोय करावी. रेल्वे स्थानकांवरील फूड प्लाझामध्ये खाद्यपदार्थ विकत घेता येऊ शकतील पण, सध्या तरी तिथे बसून खाण्याची मुभा नाही.

३ तासांमध्ये सव्वाचार लाख तिकिटे आरक्षित

२२ जनशताब्दी, पाच दुरांतो आणि ७३ मेल व एक्स्प्रेस प्रवासी गाडय़ा अशा १०० रेल्वेसाठी (२०० फेऱ्या) पुढील ३० दिवसांसाठी आरक्षण प्रक्रिया गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली. पहिल्या तीन तासांमध्ये ७६ रेल्वेसाठी आरक्षणाची सुविधा उपलब्ध झाली होती. दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे सव्वाचार लाख प्रवाशांसाठी (४,२३,५३८) रेल्वेची १ लाख ७८ हजार ९९० तिकिट आरक्षित झाली. एकाच वेळी २०० रेल्वेचे आरक्षण ऑनलाइन सुरू झाले नाही. रेल्वेच्या संकेतस्थळावर आरक्षणासाठी ‘लॉग इन’ करणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याने समस्या निर्माण झाल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. प्रारंभी स्थानक व गंतव्य स्थानक अशा दोन्ही ठिकाणांहून एकाचवेळी सर्व प्रकारची माहिती संकेतस्थळावर अपलोड करावी लागत असल्याने प्रत्यक्ष आरक्षण प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागत होता. शिवाय, वादळामुळे ईशान्य व पूर्वेकडील रेल्वेच्या आरक्षणासाठी देखील काही समस्या उत्पन्न झाली होती. मात्र, सकाळी ११ वाजेपर्यंत ६९ रेल्वेसाठी आरक्षण प्रक्रिया सुरू झाली होती व त्याचा वेग नंतर वाढत गेल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.