करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनचा फटका देशभरातील कामगार आणि मजूर वर्गाला बसला. अखेरीस या कामगारांना आपल्या घरी जाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली. रेल्वे विभागाने या कामगारासांठी विशेष श्रमिक एक्सप्रेस गाड्याही सुरु केल्या. मात्र अनेक कामगार सध्याच्या घडीला रस्त्याने चालत, मिळेत त्या वाहनाने स्वतःचा जीव धोक्यात घालत आपल्या घराकडे प्रवास करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मजुरांना अपघातात आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

देशातील इतर राज्यांप्रमाणे दिल्लीतही अनेक परप्रांतीय मजूर काम व रोजगारासाठी येत असतात. मध्यंतरी दिल्लीत परप्रांतीय मजुरांची घरी जाण्यासाठी गर्दी हा चांगलाच चर्चेचा मुद्दा झाला होता. मात्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, कामगारांना आमचं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांची सर्व जबाबदारी सरकार घेईल असं आश्वासन दिलं आहे.

दिल्लीचे उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन सुमारे ३५ हजार मजूरांना रेल्वेने त्यांच्या गावी पाठण्यात आल्याची माहिती दिली. मजूरांच्या प्रवासाचा सर्व खर्च दिल्ली सरकार करणार असल्याचंही यावेळी सिसोदीयांनी सांगितलं.