पुस्तकविश्वात अत्यंत प्रतिष्ठेच्या बुकर पुरस्कारावर यंदा ऑस्ट्रेलियाच्या रिचर्ड फ्लॅनेगन यांनी मोहर उमटविली. दुसऱ्या महायुद्धकालीन वातावरणात थायलंड-बर्मा रेल्वे बांधकामासाठी जुंपल्या गेलेल्या युद्धकैद्यांची कहाणी चितारणाऱ्या ‘द नॅरो रोड टू डीप नॉर्थ’ या त्यांच्या कादंबरीसाठी फ्लॅनेगन यांना पुरस्कार देण्यात आला. गेल्या दोन दशकांमध्ये या पुरस्काराच्या स्पर्धेत भारतीय नावांची वर्णी लागत असल्याने या पुरस्काराविषयीचे देशी कुतूहल वर्षोगणिक वाढत आहे. यंदा भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक नील मुखर्जी हेही या स्पर्धेत होते. हा पुरस्कार तब्बल ५० हजार पौंडांचा आहे.
दुसऱ्या महायुद्ध काळात युद्धकैदी म्हणून थायलंड-बर्मा रेल्वेसाठी जुंपल्या गेलेल्या एका सैनिकाच्या पोटी जन्मलेल्या फ्लॅनेगन  यांचा जन्म ऑस्ट्रेलियाचा भाग असलेल्या  तस्मानिया येथे झाला. त्यांनी आतापर्यंत सहा कादंबऱ्या लिहिल्या असून आपल्याच ‘द साऊंड ऑफ वन हॅण्ड क्लॅपिंग’ या कादंबरीवरील चित्रपटही दिग्दर्शित केला आहे. बाझ लुहरमन यांच्या ‘ऑस्ट्रेलिया’ या बहुचर्चित चित्रपटाची पटकथा त्यांची आहे.
भारतीय कनेक्शन?
अरुंधती रॉय ते अरविंद अडिगा या विजेत्या भारतवासीय लेखकांची या पुरस्कारावर मुद्रा उमटल्याने भारतीय वाचकांच्या मनात या पुरस्काराविषयी वाढते कुतूहल आहे.  
यंदा कोलकाता येथे जन्मलेले नील मुखर्जी यांचे नावही या स्पर्धेत आघाडीवर होते. त्यांची दुसरी कादंबरी ‘लाइव्ह्ज ऑफ अदर्स’ पुरस्कार मिळवेल अशी अटकळ बांधली जात होती.

दीड वर्षांपूर्वी हे पुस्तक संपविले, तेव्हा खाणींत पुन्हा काम करण्याचा विचार मनात डोकावला होता. या पुस्तकासाठी मी खूप खर्च केला. लेखकीय आयुष्यामुळे पत्नी आणि तीन मुलांसाठी पुरेसा पैसा मी कधी उभारू शकलो नाही. त्यामुळे या पुरस्काराचा आनंद आहेच.
    – रिचर्ड फ्लॅनेगन