केंद्र सरकारने ५०० आणि हजारच्या नोटा बंद केल्यानंतर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका होत आहे. आता माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली आहे. जनतेची दोन महिने गैरसोय केल्यानंतर आणि काळे धन बाहेर आल्यानंतर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील का? असा सवाल लालूप्रसाद यांनी केला आहे. हे सगळे करून जर लोकांना १५ लाख नाही मिळाले तर, मोदींनी केलेला हा फर्जिकल स्ट्राइक असेल आणि सर्वसामान्यांचा ‘फेक एन्काऊंटर’ असेल, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर लालूप्रसाद यांनी ट्विटद्वारे मोदींवर निशाणा साधला आहे. आमचा काळ्या पैशाला विरोध आहे. पण मोदींनी केलेल्या कारवाईत दूरदृष्टीचा अभाव आहे. सर्वसामान्य जनतेची काळजी करायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला. नोटबंदीनंतर मोदींच्या जपान दौऱ्यावरूनही त्यांनी टीका केली आहे. मोदींच्या नाटकीय भाषणबाजीमुळे जनतेचे सांत्वन आणि दुःखही संपणार नाही, असे लालूप्रसाद म्हणाले.

यावेळी लालूप्रसाद यांनी मोदींना अनेक सवाल केले. खात्यात पैसे असूनही किती लोक भूकेने आणि उपचारांअभावी मृत्यू पावले, याची आकडेवारी मोदी सरकार ५० दिवसांनंतर जाहीर करणार आहे का, असा प्रश्न त्यांनी केला. देशातून भ्रष्टाचार आणि काळा पैसा संपवण्याची इच्छा बाळगणाऱ्या मोदींनी २००० रुपयांची नवीन नोट चलनात का आणली, असा सवालही त्यांनी केला. तुमच्या नाटकीय भाषणांमुळे लोकांचे दुःख कमी होऊ शकत नाही. परिस्थिती चिघळत चालली आहे. लोक त्रस्त असताना तुम्ही भाषणबाजी करत आहात, अशी टीकाही लालूप्रसाद यांनी मोदींवर केली आहे.