लंडनमधील मालमत्ता खरेदीत काळय़ा पैशाचा वापर केल्याच्या प्रकरणी सत्याचाच विजय होईल, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे व प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी म्हटले आहे.

वढेरा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, की ‘या प्रकरणात माझी चौकशी सुरू असताना देशातील जे मित्र व परिचितांनी मला पाठिंबा दिला त्यांचा मी आभारी आहे. या सगळय़ा चौकशीला खंबीरपणे तोंड देण्यास मी समर्थ आहे. या सगळय़ातून शेवटी सत्याचाच विजय होईल. सर्वाना रविवारनिमित्त शुभेच्छा!’

गेल्या तीन दिवसांतील जाबजबाबात सक्तवसुली संचालनालयाने वढेरा यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असून, त्यांच्या लंडनमधील मालमत्ता बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे, पण वढेरा यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून, राजकीय सुडापोटी आपल्याला छळण्यासाठी हे आरोप करून जाबजबाब घेतले जात आहेत असे वढेरा यांचे म्हणणे आहे. १२ फेब्रुवारी रोजी वढेरा यांचे जयपूर येथील सक्तवसुली संचालनालय कार्यालयात जाबजबाब होणार आहेत. बिकानेर येथील जमीन घोटाळय़ात त्यांचा हात असून, त्यांनी काळय़ा पैशातून ही मालमत्ता मिळवल्याचा आरोप आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने वढेरा यांना चौकशीत सहकार्य करण्याचा आदेश दिला आहे.

वढेरा यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाकडे जे प्रकरण आहे ते लंडन येथील ब्रायन्स्टन स्क्वेअर येथील १.९ दशलक्ष पौंडांच्या घरांसंदर्भात असून, ही घरे वढेरा यांची आहेत असे मानले जाते. सक्तवसुली संचालनालयाने सांगितले, की लंडन येथे वढेरा यांच्या मालमत्ता असून त्यांची माहिती मिळाली आहे. त्यात ५ दशलक्ष पौंड व ४ दशलक्ष पौंड किमतीच्या दोन घरांचा तसेच सहा सदनिका व इतर मालमत्तांचा समावेश आहे. वढेरा यांचे जाबजबाब पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अन्वये घेण्यात आले आहेत.