संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) बंडखोर नेते व राज्यसभा खासदार शरद यादव आणि अली अन्वर अन्सारी यांच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या अपात्रतेबाबत ३० ऑक्टोबर रोजी फैसला होणार आहे.

जदयू नेते आरसीपी सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेण्यात आली आहे. राज्यसभेत यादव यांच्या जागी जदयूने आरसीपी सिंह यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे याप्रकरणी राज्यसभा सचिवालयाने यादव यांना नोटीस पाठवली आहे.

आरसीपी सिंह यांनी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याकडे यादव आणि अन्सारी या दोन खासदारांना अपात्र ठरवण्याची विनंती केली होती. जदयूच्या या दोन्ही नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला असून त्यांनी याद्वारे स्वतःहून पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचेही म्हटले आहे.

बिहारमध्ये जदयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महाआघाडीतून बाहेर पडून भाजपशी हातमिळवणी केली. यानंतर बिहारमध्ये जदयू -भाजप युतीचे सरकार स्थापन केले होते. नितीशकुमार यांच्या या कृतीचा यादव आणि अन्सारी यांनी विरोध केला होता. आपल्याला विश्वासात न घेताच ही कृती केल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच त्यानंतर यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका करीत लालू प्रसाद यादव यांच्या ‘देश बचाओ, भाजप भगाओ’ या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. यादव आणि अन्सारी यांनी बंड करुन राजदशी हातमिळवण्याचा केल्याचा आरोप आहे.

जदयूचे राज्यसभा सदस्य अली अन्वर अन्सारी यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यांत संपत आहे. तर शरद यादव यांचा कार्यकाळ २०२२ पर्यंत असणार आहे. मात्र, आता या दोघांवरही सदस्यत्व गमावण्याची वेळ येऊ शकते.