सोशल मीडिया हे सध्याच्या काळातले सर्वात प्रभावी माध्यम समजले जाते. मात्र यावर येणाऱ्या सगळ्याच बातम्या किंवा लेख खरे असतात असे नाही. आजही एका बातमीमुळे सोशल मीडियावरच्या अफवांची चर्चा रंगली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर काही काळासाठी व्हायरल झाली. काही लोकांनी तर त्यांना आदरांजलीही वाहिली. मात्र या बातमीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही असे भाजपाच्या प्रवक्त्यांनी लोकसत्ता ऑनलाइनला सांगितले आहे. याआधीही दोन ते तीन वेळा अशाच प्रकारे अफवा पसरल्या होत्या.

याआधी घडलेल्या घटना
२०१५ मध्ये ओदिशा येथील एका प्राथमिक शाळेचे प्राचार्य कमलकांत दास यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे निधन झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी श्रद्धांजली सभाही आयोजित केली. तसेच विद्यार्थ्यांना सुट्टीही जाहीर केली होती. दास यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांना ही बातमी सांगितली जी खरी आहे की नाही हे पडताळताच त्यांनी शाळेला सुट्टी जाहीर केली.

तसेच २४ डिसेंबर २०१६ ला मध्य प्रदेशातील गर्ल्स कॉलेजमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस साजरा केला. या कार्यक्रमात अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमात अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला हार घालण्यात आला तसेच त्यांच्या फोटोजवळ दिवा आणि उदबत्तीही लावण्यात आली होती. या सगळ्या प्रकारानंतर जेव्हा या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सत्य समजले तेव्हा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनांच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही असे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच खात्री केल्याशिवाय असे मेसेज पाठवू नका फॉरवर्ड करू नका असेही भाजपाच्या सूत्रांनी म्हटले आहे.