माकप आणि भाजप-रा.स्व.संघात संघर्ष सुरूच; कन्नूर जिल्ह्यात घरे, दुकानांवर हल्ले  

केरळमध्ये शनिवारी कन्नूर जिल्ह्यात माकप व भाजप-रा.स्व.संघ यांच्यात राजकीय हिंसाचाराच्या घटना घडल्या असून त्यात अनेक घरे व दुकाने यावर हल्ला करण्यात आला. कार्यकर्त्यांवरही हल्ले करण्यात आले. शबरीमला प्रकरणावरून हा सगळा हिंसाचार झाला आहे.

अनेक ठिकाणी बॉम्बफेक करण्यात आली, त्यात माकपचे आमदार ए.एन. शमशीर, भाजप नेते व राज्यसभा  सदस्य व्ही. मुरलीधरन, कन्नूरचे माजी माकप सचिव पी.शशी यांच्या घरांवर मध्यरात्रीनंतर हल्ले करण्यात आले असे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यांमध्ये कुणीही जखमी झाले नाही. माकप व भाजप-संघ यांच्या कार्यकर्त्यांची शांतता बैठक झाल्यानंतर शमसीर व शशी यांच्या घरावर हल्ले करण्यात आले. त्यानंतर भाजप खासदाराच्या घरावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांमुळे जनजीवन विस्कळित झाले असून वर्षभरानंतर कन्नूरमध्ये राजकीय हिंसाचार पुन्हा सुरू झाला आहे. २ जानेवारीला दोन महिलांनी अय्यपा मंदिरात प्रवेश केल्याच्या घटनेनंतर भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. कन्नूरशिवाय पेराम्ब्रा, मलापुरम, अदूर येथे हिंसाचार झाला आहे. तेथे  शुक्रवारी रात्री अनेक हल्ले  झाले असून शनिवारी सकाळीही काही हल्ले झाले. कन्नूर व राज्यातील इतर भागात जनजीवन विस्कळीत झाले असून राज्याचे पोलिस प्रमुख लोकनाथ बेहेरा यांनी राज्यव्यापी सतर्कता इशारा दिला आहे. एकूण २६० लोकांना  दोन दिवसात कन्नूर येथील हिंसाचारात अटक करण्यात आली असून पोलिसांनी शनिवारी थलासेरी येथे संचलन केले. तेथे १९ जणांना अटक केली असून ३३ जणांना ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी परीयारम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय अज्ञात लोकांनी जाळले.

‘मंदिर शुद्धीकरण करणारा तंत्री म्हणजे राक्षस’

कोची : दोन महिलांच्या मंदिर प्रवेशानंतर तेथे शुद्धीकरण करणारे शबरीमलाचे तंत्री( मुख्य धर्मगुरू) हे  राक्षस आहेत, अशी टीका केरळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व माकप नेते जी. सुधाकरन यांनी केली.

हिंसाचारात राज्य सरकारचा हात- भाजप

शबरीमलातील मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्याच्या घटनेनंतर केरळमध्ये उसळलेल्या हिंसाचारात तेथील राज्य सरकारचाच हात आहे, असा आरोप भाजपने शनिवारी केला आहे. हे प्रकरण संवेदनशील पद्धतीने हाताळण्याऐवजी डाव्या आघाडी सरकारने भक्तगणांमध्ये भीती पसरवून हिंसाचार घडवून आणला, त्यात काही जखमी तर काही जण ठारही झाले आहेत असे सांगून भाजपने म्हटले आहे, की माकपच्या गुंडांनी सरकारच्या पाठिंब्याने हिंसाचार घडवून आणला असून माकपला भाजप व संघाविरोधात हिंसाचार केल्याचा इतिहासच आहे. पण आता ते भक्तांच्या जिवावरही उठले आहेत. शबरीमला प्रकरण हे हिंदूंच्या धर्माचरणाशी संबंधित होते, त्यात सत्ताधारी पक्षाने हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती. हिंसाचारात एक भक्तगण मारला गेला असून भाजप खासदाराच्या घरावर बॉम्बफेक करण्यात आली, असे भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव यांनी सांगितले. शबरीमलाचे आंदोलन राजकीय नव्हते. त्यात परंपरेच्या रक्षणासाठी शांततामय निदर्शने केली जात होती, पण त्याला सत्ताधारी सरकारने हिंसक वळण लावले असेही ते म्हणाले.