समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांना बुधवारी दुपारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही माहिती देण्यात आली नाही. परंतु असे मानले जाते की ८१ वर्षीय मुलायमसिंह यादव यांच्यावर वृद्धापकाळामुळे आलेल्या अरोग्याचा समस्येवर उपचार केले जात आहेत.

मुलायमसिंह यांना गेल्या काही वर्षांपासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या भेडसावत आहेत. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, गेल्यावर्षी त्यांना मूत्रपिंडाच्या विकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मुलायम यांना करोनाचा देखील संसर्ग झाला होता. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती.

हेही वाचा- मायावतींची घोषणा ; उत्तरप्रदेश, उत्तराखंडमधील विधानसभा बसपा स्वबळावरच लढवणार!

मुलायमसिंह राजकीयदृष्ट्या सध्या सक्रिय नाहीत. मात्र सपा नेते त्यांची भेट घेत राहतात. मुलायम स्वत: अनेकदा सपा कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांशी बोलत असतात.

विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी

कानपूरमध्ये समाजवादी पार्टीने ठिकठिकणी ‘अब युपी में खेला होई’ अशा घोषणा असणारे फलक लावले आहेत. या फलकावर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, समाजवादी पार्टीचं सायकल चिन्हं आणि स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत. या घोषणेद्वारे समाजवादी पार्टीने योगी सरकारविरुद्ध शंखनाद केला आहे. समाजवादी पार्टीचे कानपूर शहरप्रमुख डॉ. इम्रान यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.