जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ पुतळ्याचं अनावरण बुधवारी करण्यात येणार आहे. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या गुजरातमधील नर्मदा नदीकिनारी बांधण्यात आलेल्या १८२ मीटर उंच असलेल्या पुतळ्याचे लोकार्पण केले जाईल. भाजपाने या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून मागील काही महिन्यांपासून हा पुतळा चांगलाच चर्चेत आहे. मात्र २ हजार ९८९ कोटी रुपये खर्च करुन हा पुतळा उभारण्यात आल्याने अनेकांनी या खर्चावर आक्षेप नोंदवला आहे. यामध्ये नेत्यांपासून ते स्थानिक गावकऱ्यांचाही समावेश आहे. पुतळ्यावरून हा वाद सुरु असतानाच खुद्द सरदार पटेल यांचा एखाद्या व्यक्तीचा पुतळा किंवा स्मारकं बांधण्याला विरोध होता हे त्यांनीच लिहीलेल्या एका लेखामधून समोर आले आहे.
भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार पटेल यांचा हा लेख आता ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर बरोबर दोन आठवड्यांनी म्हणजे १४ फेब्रुवारी १९४८ रोजी पटेल यांनी याच विषयासंदर्भात एक लेख लिहीला होता. ‘दु:ख करत बसणे पुरे झाले आता कामाला लागा’ अशा मथळ्याखाली पटेलांनी हा लेख लिहीला होता. यामध्ये त्यांनी गांधीजींच्या उपदेशांबरोबरच त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडलेला. ‘गांधीजींच्या नावाने मंदिर बांधणे किंवा त्यांची मूर्तीपूजा करणारी स्मारके बांधण्याला माझा सक्त विरोध आहे. अशा प्रकरणांमध्ये मी कायमच माझी मते स्पष्टपणे मांडली आहेत. अशी स्मारके बांधणाऱ्यांना किंवा तसा विचार करणाऱ्यांना असे न करण्याचा सल्ला मी देईन. त्यांनी अशाप्रकारे स्मारके बांधण्याचे काम करु नये अशी विनंती मी त्यांना करतो’ असे या लेखात म्हटले होते.
यासंदर्भातच ‘इंडियन एक्सप्रेस ग्रुप’च्या ‘समकालीन’ या वृत्तपत्रामध्ये संपादक आणि सेण्टर फॉर स्टडीज अॅण्ड रिसर्च ऑन लाइफ अॅण्ड वर्क्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल (सेरलिप) चे माजी नियंत्रक असणाऱ्या डॉ. हरी देसाई यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. ‘काही हजार कोटी रुपये खर्च करुन पटेलांचा हा पुतळा उभारण्यात आला असतानाच आपल्याला ही गोष्टही लक्षात घेणे गरजेचे आहे की, पटेल यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्याकडे केवळ २६२ रुपये होते.’ तसेच त्यावेळी सरदार पटेलांकडे असणाऱ्या संपत्तीचा ३५ लाखांचा धनादेश त्यांची मुलगी मणिबहन यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंना परत केला होता असेही देसाई यांनी सांगितले.
पटेल हे त्यांच्या साध्या राहणीमानासाठी ओळखले जात होते हेच यातून स्पष्ट होते. ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला पटेल यांचे पुत्र गौतम पटेल आणि त्यांची पत्नी नंदिनी उपस्थित राहणार नाहीत. गौतम पटेल वडोदऱ्यात राहत असले तरी त्यांचा मुलगा केदार अमेरिकेत स्थायिक आहे. त्यामुळे ते वरचेवर अमेरिकेला जात असतात. तरी या कार्यक्रमाला गुजरात सरकारने पटेल यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या ३५ जणांना आमंत्रित केले आहे.

खर्च आणि कामगार
सरदार पटेलांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ नावाने ओळखला जाणारा पुतळा उभारण्यासाठी २ हजार ९८९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. २७ ऑक्टोबर २०१४ रोजी लार्सन अॅण्ड टुब्रोने या मुर्ती बांधणीचे कंत्राट मिळवले होते. अडीच हजार कामगार, २०० इंजिनिअर्सने आपले कौशल्य पणाला लावून हा पुतळा साकारला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 2:42 pm